पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण होऊनही रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले असतानाच शहरातील ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यात ११ हजार ७०६ खड्ड्यांपैकी ११ हजार ४१८ खड्डे बुजविण्यात आले असून शहरात केवळ २८८ खड्डे असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्यात आला आहे.

समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. जुलै महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे पुढे आले. वर्षभरापासून सुरू असलेली कामे रखडल्याने पावसाळ्यातील जुलै महिन्यात भरपावसात शहराच्या विविध भागांत रस्ते खोदाई आणि रस्त्यांची कामे सुरू राहिली. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्ती करण्यास पुरेसा वेळच मिळाला नाही. त्यातच पावसातच महापालिकेच्या पथ विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली.

मुंबईत फक्त १४ खड्डे; ‘एमएमआरडीए’चा अजब दावा

मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला. मात्र ही कामेही तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर शहर आणि उपनगरात रस्ते पूर्ववत केलेल्या कामांची पोलखोल झाली. अनेक रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्राकडे शेकडो तक्रारी येत असतानाही महापालिकेने ९८ टक्के खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शहरात केवळ २८८ खड्डे बाकी असून ते युद्धपातळीवर बुजविण्यात येतील, अशी माहिती पथ विभागाकडून देण्यात आली. रस्ते दुरुस्तीसाठी विशेषत: खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे.

रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये –

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून बारा मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची कामे केली जातात. तर बारा मीटर रुंदीपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते मुख्य पथ विभागाकडून केले जातात. शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. देखभाल दुरुस्तीचा कालावधी असतानाच रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेला हा खर्च करावा लागला असल्याने रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

आकडेवारी काय दाखवते ? –

एकूण खड्डे- ११, ७०६
खड्डे दुरुस्ती- ११,४१८
शिल्लक खड्डे- २८८
चेंबर दुरुस्ती- ८०६
पाणी साठण्याच्या ठिकाणांची दुरुस्ती- ८५