पुणे : ‘महापालिकेच्या १९ पैकी केवळ चार रुग्णालयांची नोंदणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत झाली आहे. तसेच, महापालिकेने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यासाठी दिलेल्या भानगिरे रुग्णालयाचीदेखील या योजनेत नोंदणी नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ अनेक रुग्णांना मिळत नाही. तसेच, या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या उपचारांचा खर्च महापालिकेलाच करावा लागत आहे,’ असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला.

सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार नागरिकांना दिले जातात. या योजनेचा फायदा घेण्यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयांची नोंदणी या योजनेत करणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेची १९ रुग्णालये आणि प्रसूतिगृहांपैकी केवळ चार रुग्णालयांची नोंदणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आली आहे.

‘या योजनेत नोंदणी करण्यासाठी अनेक खासगी रुग्णालये टाळाटाळ करत असल्याने या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना राज्य सरकारच्या योजनेचा फायदा मिळत नाही. महापालिकेने स्वतःच्या रुग्णालयांची आणि महापालिकेच्या नियंत्रणाखाली पीपीपी तत्त्वावर चालविण्यासाठी दिलेल्या रुग्णालयांनी तरी या योजनेत नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होईल,’ असे वेलणकर यांनी सांगितले.

महापालिकेची शहरात १९ रुग्णालये आणि प्रसूतिगृहे आहेत. यापैकी केवळ डॉ. दळवी रुग्णालय, सोनावणे प्रसूतिगृह, राजीव गांधी रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालय या चारच रुग्णालयांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित १५ रुग्णालये आणि प्रसूतिगृहे अद्यापही या योजनेच्या कक्षेबाहेर असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. परिणामी अनेक रुग्णांच्या उपचारांचा खर्च महापालिकेला आपल्या तिजोरीतून करावा लागत असल्याचा दावा वेलणकर यांनी केला.

काय आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना?

राज्य सरकारने २०२३ पासून राज्यातील सर्व कुटुंबांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित रुग्णालयाची नोंदणी या योजनेत असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्यापासून ते घरी सुट्टी होईपर्यंत रोख रहित दर्जेदार वैद्यकीय सेवा या योजनेद्वारे मिळते.

ही योजना पूर्णपणे हमी तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या योजनेत पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात. रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या ३४ विशेष सेवांतर्गत शस्त्रक्रिया उपचारांच्या वैद्यकीय सेवा योजनेत असलेले सर्व आजार पहिल्या दिवसापासून समाविष्ट आहेत. या योजनेतील लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय तसेच खाजगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात.