‘केवळ मंदिर प्रवेशाने प्रश्न सुटणार नाही’ – पंकजा मुंडे

राजकारणासह प्रत्येक क्षेत्राच्या गाभाऱ्यात स्त्रीला समान अधिकार असला पाहिजे. त्यातूनच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेचे ध्येय साध्य होईल,

‘‘केवळ मंदिर प्रवेशाने स्त्रियांच्या समानतेचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणासह प्रत्येक क्षेत्राच्या गाभाऱ्यात स्त्रीला समान अधिकार असला पाहिजे. त्यातूनच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेचे ध्येय साध्य होईल,’’ असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.
माईर्स एमआयटीच्या विश्वराज हॉस्पिटलतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘आरोग्य जननी’ योजनेचे उद्घाटन पंकजा यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. हरिभाई शहा, एमआयटी शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष राहुल कराड, सचिव डॉ. मंगेश कराड, रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक डॉ. आदिती कराड या वेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, ‘‘स्त्री हा कुटुंबाचा मुख्य आधार आहे. ती एकाच वेळी घर आणि सामाजिक परिस्थितीही हाताळत असते. आज स्त्रिया विविध क्षेत्रात भराऱ्या घेत आहेत. मात्र, काही पुरुषांना स्त्रीचे मोठेपण रुचत नाही. केवळ मंदिर प्रवेशाने स्त्रियांच्या समानतेचा प्रश्न सुटणार नाही. वेळप्रसंगी स्त्रीने झाशीची राणी बनायला हवे. त्यासाठी राजकारणासह प्रत्येक क्षेत्राच्या गाभाऱ्यात स्त्रीला समान अधिकार असला पाहिजे. त्यातूनच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानतेचे ध्येय साध्य होईल,’’
‘‘गरीब कुटुंबातील मुलींना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर योग्य त्या आरोग्य सुविधा मिळू शकत नाहीत. परिणामी त्यांचे पोषण नीट होत नाही आणि त्यांना होणारी अपत्येही कुपोषित राहतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे,’’ असेही मुंडे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Opening of aarogya janani scheme by pankaja munde