निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्यासाठी मंत्र्यांना आणि राजकीय पक्षांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा खरेदी करण्यात बावीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अशाच प्रयत्नांतून झाला आहे. असा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विरोधकांना दिले.
महापालिकेने बिबवेवाडी येथे बांधलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृह आणि स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महापौर चंचला कोद्रे, आमदार जयदेव गायकवाड, अनिल भोसले, मोहन जोशी, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, सभागृहनेता सुभाष जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. नाटय़गृह उभारणीची सविस्तर माहिती यावेळी जगताप यांनी दिली. महापौरांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
ऊर्जाखात्यातील कोळसा खरेदीत अजित पवार यांनी बावीस हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने गुरुवारी केला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, मुळातच वीज निर्मितीसाठी दरवर्षी दीड हजार कोटींचा कोळसा खरेदी केला जातो. त्यापैकी निम्मा कोळसा केंद्र सरकारतर्फे पुरवला जातो. त्याच्या नोंदी केंद्राकडे असतात. त्यामुळे बावीस हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला हा आरोप हास्यास्पद आहे.
ज्यांनी आरोप केले आहेत त्यांनी पुरावे द्यावेत असे आव्हान देऊन पवार म्हणाले की, कॅगच्या तपासणीतही काही आढळलेले नाही आणि विरोधक मात्र भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळेच मंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत.

 उद्घाटनात राजकारण नको
निवडणुकीपुरते राजकारण ठीक असते; पण उद्घाटनाच्या कार्यक्रमांवरूनही राजकारण दिसत आहे. शहराच्या विकासासाठी सर्वानी मिळून काम करणे आवश्यक आहे. तशा पद्धतीने काम केले तर ते जनतेच्याही भल्याचे होते, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी पुण्यातील उद्घाटनांच्या राजकारणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. अण्णा भाऊ साठे नाटय़गृहाचे यापूर्वी महायुतीतर्फे उद्घाटन करण्यात आले आणि शुक्रवारी महापालिकेचा कार्यक्रम झाला. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, कोणताही प्रकल्प करताना तो सर्वाचा आणि शहराच्या विकासाचा झाला पाहिजे. शासनाची भूमिका सदैव मराठी रंगभूमीला प्रोत्साहन देण्याचीच राहिली आहे. नाटय़क्षेत्रासाठी पर्वणी ठरावी असेच अण्णा भाऊ साठे नाटय़गृहाचे काम झाले आहे.