कैद्यांच्या कलांना वाव देण्याचा उपक्रम प्रशंसनीय – प्रशांत दामले

येरवडा कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त निर्मिलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले.

कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांमधील कलागुण पाहून मी थक्क झालो. या कैद्यांनी निर्मिलेल्या वस्तूंची खरेदी करून नागरिकांनी त्यांच्या कौशल्याला दाद द्यावी. या कौशल्याला वाव देण्याचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी सोमवारी व्यक्त केले.
येरवडा कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त निर्मिलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले. कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपमहानिरीक्षक शहाजी सोळुंके, स्वाती साठे, अधीक्षक यू. टी. पवार, कारखाना व्यवस्थापक प्रदीप जगताप या वेळी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये फर्निचर, शोभेच्या वस्तू, पेंटिंग्ज, हातमागावरील कपडे, बेकरी पदार्थ, फराळाचे पदार्थ, आकाशकंदील या वस्तूंचा समावेश आहे.
उपाध्याय म्हणाले,की कारागृहात कैद्यांना हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, शिवणकाम, चर्मोद्योग, बेकरी पदार्थ, लोहारकाम, कपडे धुलाई, कागदनिर्मिती याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे कैद्यांना आर्थिक मोबदला मिळतो आणि शिक्षा संपल्यानंतर कैदी या प्रशिक्षणाचा वापर करून स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. दिवाळीनिमित्त महिला कैद्यांनी चकली, शंकरपाळी, बॅग्ज, कुर्ता अशा वस्तू तयार केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Opening of exhibition of diwali articles made by prisoners by prashant damle