‘‘निसर्गचित्रण करताना निसर्गाचा योग्य तो मान ठेवून त्यापासून पुरेसे अंतर राखण्याची कला शिकायला हवी. ‘आयत्या वेळी उद्भवणाऱ्या कोणत्याही संकटाला मी सहज तोंड देईन’ असा अति आत्मविश्वास बाळगलात तर चांगले छायाचित्रणही करता येणार नाही. निसर्गात वावरताना काही वेळा भीती वाटून घेण्यासही हरकत नसावी,’’ असे मत प्रसिद्ध निसर्गछायाचित्रकार राजेश बेदी यांनी व्यक्त केले.
किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी राजेश बेदी आणि निसर्गचित्रणासाठी प्रसिद्ध असलेले त्यांचे बंधू नरेश बेदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाचे निमंत्रक अतुल व आरती किलरेस्कर, अध्यक्ष माधव चंद्रचूड, संचालक वीरेंद्र चित्राव, ‘रोटरी’चे दीपक शिकारपूर, पालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अधीक्षक तुकाराम जगताप, लोकायत संस्थेच्या अलका जोशी, ‘पगमार्कस’चे अनिरूद्ध चावजी, ‘गोवाईल्ड’चे संदीप देसाई या वेळी उपस्थित होते.
राजेश यांनी आपल्या लहानपणीच्या जंगलभ्रमंतीच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘वन्य प्राण्यांच्या वर्तनाचा सखोल अभ्यास असल्याखेरीज त्यांचे पुढचे पाऊल काय असेल हे ठरवता येत नाही. त्यामुळे छायाचित्रण करताना योग्य अंतर ठेवणे गरजेचे आहे.’’
नरेश बेदी म्हणाले, ‘‘१९६७ मध्ये मी पुण्यात येऊन चित्रपटनिर्मिती शिकलो. आम्हाला आमचे काम पडद्यावर आणण्यासाठी जेवढा संघर्ष करावा लागला, तेवढे कष्ट नवीन मुलांना घ्यावे लागणार नाहीत. गेली पन्नास वर्षे मी निसर्गाच्या नाशाचा साक्षीदार आहे. विकास आणि धोक्यात आलेल्या वन्यजीवांचे अस्तित्व यात सुवर्णमध्य काढणे शक्य व्हायला हवे.’’
या वेळी छायाचित्र व लघुचित्रपट स्पर्धेच्या विजेत्यांना बेदी बंधूंच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. छायाचित्र स्पर्धेत प्रमोद चिकणे यांना प्रथम तर अनिरुद्ध राजंदेकर यांना द्वितीय पारितोषिकाने गौरवण्यात आले. श्रीधर रेड्डी आणि गिरीश शेवाळे यांना तृतीय पारितोषिक तर जया राणे, अजय सोनारीकर आणि इशान नाडकर्णी यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. लघुचित्रपट स्पर्धेत साजन सिंधू यांनी प्रथम, आरती कुलकर्णी यांनी द्वितीय आणि रीमा सेनगुप्ता यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. तर रघुनाथ रामवर, रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष, अंकिता विरमानी, किरण जोशी, अर्जुन रिहान, मयूर कुलकर्णी, कुरूश कँटीनवाला, राजेश कारेकर, ऑलिव्हर गोझेल आणि इव्हो नोरेनबर्ग यांचे लघुचित्रपट उत्तेजनार्थ पारितोषिकास पात्र ठरले.