एखाद्याच्या अंत्यविधीचे प्रक्षेपण करून देश-परदेशातील नातेवाइकांना अंत्यदर्शनाची संधी देणाऱ्या ‘रज्जूचक्षू’ प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ झाला.  देवदिवाळीच्या मुहूर्तावर वैकुंठ स्मशानभूमी येथे दीपोत्सवाने या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
‘निनाद’ संस्थेतर्फे पुणे महापालिकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या रज्जूचक्षू प्रकल्पाचे उद्घाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग सहसंघचालक सुहासराव पवार, माजी नगरसेवक उदय जोशी, शुभदा जोशी, क्षेत्रीय अधिकारी जयंत भोसेकर, सुनील केसरी, बाबा शिंदे, रामलिंग शिवणगे, अनुप जोशी, संजय सोनटक्के, मयूरेश जोशी, संजय देशपांडे, अमित लोणकर या वेळी उपस्थित होते. वैकुंठ स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
अनेकांचे नातेवाईक देश-परदेशात वास्तव्यास आहेत. एखाद्या दुर्घटनेत पुण्यातील कोणाचा मृत्यू झाल्यास परदेशातून येथे येणे शक्य होत नाही. त्यामुळे आधुनिक काळात निनाद संस्थेने राबविलेला रज्जूचक्षू हा प्रकल्प स्तुत्य आहे. केवळ फ्लेक्सबाजी करण्याऐवजी असे खरे सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे, असे मत दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले.
उदय जोशी म्हणाले,की दु:खात असलेल्या मृताच्या नातेवाइकांना किमान त्यांचे अंत्यदर्शन मिळावे हा उद्देश आहे. या माध्यमातून विद्युतदाहिनीचा वापर वाढणार असून लाकडाचा वापर कमी झाल्याने पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे. अंत्यविधीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या जागी डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (डीव्हीआर) बसविण्यात आला असून यामध्ये दिवसाप्रमाणेच रात्रीच्यावेळी होणारे अंत्यविधी रेकॉर्ड होणार आहेत.