पुणे : ‘‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे वळवण्यात आली. मात्र, या संवेदनशील परिस्थितीतही मुंबई विमानतळाने एकाच दिवसात मोठ्या संख्येने उड्डाणे हाताळल्याने देशाची हवाई वाहतूक व्यवस्थापन क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली,’ असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त) यांनी व्यक्त केले. आत्मनिर्भर भारत संकल्पनेचेही त्यांनी कौतुक केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आणि ‘आयएमसीसी’तर्फे शनिवारी मुंबई विमानतळ हवाई वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांना ‘व्होकेशनल सर्व्हिस ॲवॉर्ड्स’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी हसबनीस बोलत होते. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), हवाई वाहतूक व्यवस्थापनाचे (एटीएम) महाव्यस्थापक अजय जोशी, ‘आयएमसीसी’च्या उपसंचालक मानसी भाटे, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्ष माधवी चव्हाण, प्रकल्प समन्वयक डॉ. माधवी मेहेंदळे, मुकुंद चिपळूणकर उपस्थित होते.
मुंबई विमानतळ हवाई वाहतूक नियंत्रण विभागातील पी. आर. जयप्रकाशन, कामना श्रीवास्तव, गिरीश कामत, ओमप्रकाश खमीतकर, संतोष भावेकर या अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. नागरी आणि लष्करी विमानांच्या वाहतुकीसंदर्भात हवाई वाहतूक नियंत्रण (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी) क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज होणारा वापर, त्यातील महत्त्वाचे बारकावे, अभ्यासक्रम आणि भविष्यातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
हसबनीस म्हणाले, ‘भारतीय स्वदेशी प्रणाली दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रगल्भ होत आहे. विशेषतः ‘आकाश’ आणि ‘ड्रोन-मिसाइल’ विरोधी यंत्रणा यांचा सैन्यदलात महत्त्वाचा वापर होत आहे. संरक्षण,सशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून तयार केलेल्या या संशोधनाबरोबर यामध्ये खासगी क्षेत्रातील संशोधनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे बदल खूप चांगले असून, देश वेगाने प्रगती करत आहे.’
गोखले म्हणाले, ‘हवाई वाहतूक नियंत्रण या विभागाचा सैन्यामध्ये उपयोग होतो. हवाई वाहतूक नियंत्रकांमुळे हवाई दलाला मोहिमा यशस्वी करण्यास मदत होते. या विभागामुळे अपघात टाळणे; तसेच सुरक्षितता, विमानांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि समन्वय साधण्याचे काम केले जाते.’
भारतीय बनावटीची साधने वापरताना ती उच्च दर्जाची असल्याचे स्पष्ट होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. सैन्यदलांत मोठी प्रगती होत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण हे आव्हानात्मक बनले असून, काळानुरूप तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. – लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त)
