पंकजा मुंडे यांचे विधान

गोपीनाथ मुंडे यांचे राजकारणात खूप विरोधक होते, ते माझेही विरोधक बनले आहेत. ते सारे मला संपवू पाहत आहेत, असे सूचक विधान राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चिंचवडला केले. माझ्यावर अघोरी प्रेम करू नका, डोळस आणि शाश्वत भूमिका घ्या, असे समाजबांधवांना आवाहन करतानाच ‘सोशल मीडिया’वर सातत्याने जातीयवाद फोफावण्याचा प्रयत्न होत असल्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाच्या वतीने प्रशासकीय सेवेतील उत्तीर्ण व उच्चपदस्थ गुणवंतांचा पंकजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तेव्हा त्या बोलत होत्या. रामकृष्ण मोरे नाटय़गृहातील या कार्यक्रमास महेश लांडगे, सुधाकर आव्हाड, किरण गित्ते, अच्युत हंगे, सविता गोल्हार, सदाशिव खाडे, रघुनंदन घुले, माउली थोरात, केशव घोळवे आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, की मलाही बऱ्याच गोष्टींचा त्रास आहे. मुंडे यांचे राजकारणात खूप विरोधक होते, ते माझेही विरोधक बनले आहेत. देशातील, राज्यातील अनेक दिग्गज त्यात आहेत. त्यांना मला संपवायचे आहे. आपलेच सैन्य त्यांच्या हाताशी लागले आहे. अशावेळी वेगळी परिस्थिती निर्माण होते. एकाच गुरूचे दोन शिष्य असल्याने लढणे अवघड आहे. मात्र, हे धर्मयुद्ध असल्याने लढावेच लागणार आहे. जितक्या टाळ्या मिळतात, तितका संघर्षही आहे. प्रामाणिकपणे काम केल्यास त्रास हा भोगावाच लागतो. अनेक घटना व्यथित करणाऱ्या आहेत. मात्र, समाज पाठिशी आहे, हे विसरता येणार नाही. मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा होता. त्यांनी वंचित, पीडितांसाठी काम केले. जोडलेली माणसे हीच त्यांची खरी संपत्ती होती व ती मालमत्ता ते माझ्यासाठी सोडून गेले आहेत. नेतृत्वाला शक्ती मिळायला हवी, आपला समाज  एकजुटीने राहिला पाहिजे. आपली ऊर्जा महत्त्वाची असून ती सकारात्मक कामासाठी वापरली पाहिजे. राष्ट्रपुरुषांना कोणत्याही जाती-धर्माच्या चौकटीत मर्यादित करू नये.

पोलिसाचा सॅल्युट आवडतो

गणवेशातील पोलीस अधिकाऱ्याने कडक सलाम ठोकला की आपल्याला खूप आनंद होतो, अशी टिपणी पंकजा मुंडे यांनी या वेळी केली. आपल्याला लाल दिव्याचेही आकर्षण नाही. काही गोष्टी आवडतात, त्याचे कारण माहिती नसते. मंत्री झाल्यानंतर जेव्हा पोलीस आपल्यासमोर यायचे आणि कडक सलाम ठोकायचे, त्याचा आपल्याला खूप आनंद व्हायचा, असे त्या म्हणाल्या. पोलिसाच्या वर्दीत शक्ती असते, त्याचा वापर समाजहितासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.