लोकसत्ता प्रतिनिधी पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अगरवाल दाम्पत्य धनाढ्य आहे. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होतील. आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्या यावा, अशी विनंती तपास अधिकारी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सोमवारी न्यायालयात केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जामीन अर्जावरील यु्क्तिवाद पूर्ण केला. ॲड. हिरे यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध केला. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी धनाढ्य आहेत. अपघातानंतर मुलाच्या रक्तनमुन्या बदल करण्यासाठी त्यांनी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना अश्फाक इनामदाकर, अमर गायकवाड यांच्यामार्फत पैसे दिले. डाॅ. तावरेला त्यांनी मोठी रक्कम देऊ केली होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सहा साक्षीदार आहे. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते साक्षीदारांना धमकावतील. अगरवाल दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होण्याची शक्यता आहे, असे सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात सांगितले. हेही वाचा >>>पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील विशाल, आई शिवानी यांचे डीएनए चाचणी अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे अहवालातून दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. बचाव पक्षाकडून ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. सुधीर शहा, ॲड. ऋषीकेश गानू, ॲड. प्रसाद कुलकर्णी, ॲड. सत्यम निंबाळकर काम पाहत आहेत. अगरवालच्या मित्राने दिले पैसे विशाल अगरवालचा बांधकाम व्यावसायीक मित्र आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त अधिकाऱ्याने डॉ. अजय तावरेशी ओळख काढली होती. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. अगरवालच्या सांगण्यावरून त्याचा मित्र राजू याने चालकाकडे अमर गायकवाड आणि अश्फाक मकानदार यांना देण्यासाठी चार लाख रुपये दिले होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात दिली. या गुन्ह्यात ससूनमधील एका अधिकाऱ्याने जबाब दिला. अपघाताचे वृत्त दूरचित्रवाहिनीवर पाहिल्यानंतर अधिकाऱ्याने मुलाच्या रक्त तपासणीचे अहवाल मागविले होते. अहवाल संशयास्पद वाटल्याने संबंधित अधिकाऱ्याने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती, असे हिरे यांनी युक्तिवादात नमूद केले.