‘भांडारकर’च्या निवडणुकीसाठी या वेळी ‘ओएमआर’ मतपत्रिका

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या त्रवार्षिक निवडणुकीमध्ये आधुनिकतेची कास धरीत पारंपरिक मतपत्रिकेऐवजी यंदा मतदारांना ‘ओएमआर’ (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) मतपत्रिका दिली जाणार आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या त्रवार्षिक निवडणुकीमध्ये आधुनिकतेची कास धरीत पारंपरिक मतपत्रिकेऐवजी यंदा मतदारांना ‘ओएमआर’ (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन) मतपत्रिका दिली जाणार आहे. बोगस मतदानासारखे अपप्रकार टाळण्याबरोबरच निवडणूक पादर्शक पद्धतीने व्हावी हाच त्यामागचा उद्देश आहे. या मतपत्रिकेमुळे मतमोजणीचा वेळ देखील वाचणार आहे.
भांडारकर संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून नियामक मंडळाच्या २५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी संस्थेच्या २ हजार ६३ आजीव सभासदांना २५ एप्रिल रोजी मतपत्रिका रजिस्टर्ड एडीद्वारे पाठविण्यात येणार आहेत. मतदारांनी ५ जूनपर्यंत मतपात्रिका संस्थेकडे पाठविणे अपेक्षित असून ६ जून रोजी मतमोजणी होऊन नवे नियामक मंडळ अस्तित्वात येणार आहे.
ही निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी यंदा प्रथमच पारंपरिक मतपत्रिकेऐवजी मतदारांना ‘ओएमआर’ मतपत्रिका पाठविण्यात येणार आहेत. या मतपत्रिकेच्या कडेला चौकोनी ठळक काळ्या रंगातील चौरसाकृतीमध्ये सर्व उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या मतपत्रिकेचे संगणकाच्या साहाय्याने वाचन करता येणे शक्य होणार आहे. ही माहिती ‘एक्सेल-शीट’मध्ये देखील दिसणार आहे. या आधुनिक पद्धतीमुळे मतमोजणीच्या वेळेतही बचत होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या मानद सचिव आणि निवडणूक अधिकारी डॉ. मैत्रेयी देशपांडे यांनी दिली. प्रत्येक मतपत्रिकेच्या मागील बाजूस संस्थेचा शिक्का आणि निवडणूक अधिकाऱ्याची सही असेल. त्याचप्रमाणे मतपत्रिका रंगीत करण्यात आली आहे. बनावट मतपत्रिकेच्या आधारे मतदान करणे कोणालाही शक्य होणार नाही. मतपत्रिकेबरोबर दोन पाकिटे जोडण्यात आली असून एकामध्ये प्रत्यक्ष मतपत्रिका आणि दुसऱ्या पाकिटामध्ये मतदाराचे ‘सर्टिफिकेशन ऑफ व्होटिंग’ असेल. त्यामुळे सर्टिफिकेशन ऑफ व्होटिंग असलेल्या मतपत्रिकेचाच मतमोजणीच्या वेळी विचार केला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Optical mark recognition ballot for bhandarkars election