पोलीस असून तुम्हाला कायदा सुव्यवस्थता राखता येत नसेल, तर स्वसंरक्षणार्थ महिलांनाच कायदा हातात घ्यावा लागेल, असे सांगत सोनसाखळी चोरांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दामिनी ब्रिगेडने दिला आहे.
शिवसेना नगरसेविका व दामिनी ब्रिगेडच्या अध्यक्षा सुलभा उबाळे यांनी पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांना दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये असलेले असुरक्षिततेचे वातावरण पाहता भुरटय़ा चोरांचा विषय गांभीर्याने घेण्याची व त्या दृष्टीने आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होताना पाहूनही पोलीस यंत्रणा सुस्तावली आहे. गुन्हेगार मोकाट असून वृद्धांना व महिलांना फिरायची चोरी झाली आहे. शहरभरात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी चोर पोलिसांना सापडत नाहीत, हे दुर्दैवी आहे. पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, ते जमत नसेल, तर आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा उबाळे यांनी दिला आहे.