ऑनलाइन परीक्षेसह विविध मुद्दय़ांवर ९ एप्रिलला आंदोलन
पुणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊनही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेची मागणी करणे ही धोक्याची घंटा असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी मांडले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आणि विद्यार्थी संघटनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची उन्हाळी सत्राची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेच्या बाजूने कल नोंदवला असून, ऑनलाइन परीक्षेसह विविध मुद्दय़ांवर ९ एप्रिलला विद्यापीठात आंदोलन करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागल्याने परीक्षांना विलंब झाला. आता महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झाल्याने उन्हाळी सत्राच्या परीक्षा जून-जुलैमध्ये ऑफलाइन
पद्धतीने आयोजित केल्या जाणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. मात्र काही विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्याकडून ऑनलाइन परीक्षेसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सर्वेक्षणाच्या बाजूने कल नोंदवला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागाचे अध्यक्ष ओंकार बेनके म्हणाले, की ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसह विविध मुद्दय़ांवर विद्यापीठात ९ एप्रिलला आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यापीठाने हिवाळी सत्राच्या परीक्षा तीन महिने उशिराने ऑनलाइन पद्धतीने घेतल्या. उन्हाळी सत्राचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात आला. आता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे शेवटचे सत्र संपण्यास उशीर होणार असल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. शैक्षणिक सत्र संपत येऊनही वसतिगृहे सुरू झालेली नाही. शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक शुल्कात कपात न होता शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जातो.