पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (सीईटी सेल) घेतल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विविध सामायिक प्रवेश परीक्षांसाठी (सीईटी) यंदा अर्जामध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सर्व सीईटींसाठी मिळून ८ लाख ६८ हजार अर्ज दाखल झाले होते, तर यंदा ११ लाख २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. काही अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची मुदत अद्याप बाकी असल्याने अर्ज संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, विधी, शारीरिक शिक्षणशास्त्र, शिक्षणशास्त्र, फाईन आर्ट्स आदी पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सीईटी सेलने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या ऑगस्टमध्ये, कला शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या दृश्यकला अभ्यासक्रमाची परीक्षा १२ जूनला, तर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील चार अभ्यासक्रमांच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांची ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया मार्च-एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली. आतापर्यंत काही अभ्यासक्रमांची नोंदणीची मुदत संपली आहे, तर काहींची अद्याप सुरू आहे.

सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, तंत्रशिक्षण, फाईन आर्ट आणि उच्च शिक्षणच्या एकूण १६ अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी आतापर्यंत ११ लाख २२ हजारहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ९ लाख ५४ हजार ४१० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे. गेल्या वर्षी ८ लाख ६८ हजार २९७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, त्यापैकी ७ लाख ५१६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

समाजमाध्यमांद्वारे प्रचार

सीईटीबाबत अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सीईटी सेलकडून समाजमाध्यमांचा वापर करण्यात येत आहे.  त्यात विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा, वेळापत्रक याबाबतची माहिती दिली जात आहे. जेईई, नीट, विद्यापीठ परीक्षा आदी कारणांमुळे वेळापत्रकात तीन वेळा बदल करावा लागला. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीची संधी मिळण्यासाठी तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. त्यामुळे अर्ज संख्येत वाढ होत आहे. यंदाची अर्जसंख्या विक्रमी म्हणता येईल. – रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल