पिंपरी: तुकोबा आणि माऊलींच्या पालखीत चोऱ्या करणाऱ्या ६० आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गजाआड केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या या चोऱ्यांमध्ये आरोपींनी जवळपास साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरले होते. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. यातील बहुतांश आरोपी नगर, बीड, लातूर भागातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी याबाबतची माहिती दिली. देहू आणि आळंदीतून प्रस्थान केलेल्या पालखीत चोऱ्या करण्यासाठी आलेल्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी आठ पथके नियुक्त करण्यात आली होती. गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या २२५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील ६० जणांना गजाआड टाकण्यात आले. मंगळसूत्र चोरणारे, पाकीटमार आदी स्वरूपातील गुन्हे त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय, न्यायालयात हजर न राहिलेल्या एका पसार आरोपीसह इंद्रायणी नदीत अंघोळ करणाऱ्या वारकरी महिलांची छायाचित्रे काढणाऱ्या दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, शैलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राहूल कोळी, सतेज जाधव, राजन महाडिक, गणेश रायकर आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.