पुणे : मोसमी पाऊस सक्रिय होऊनही अद्याप शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षाच आहे. दुसरीकडे पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून विविध ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जून महिना संपला, तरी अद्याप वरूणराजा प्रसन्न न झाल्याने सध्या जिल्ह्यातील तब्बल ९९ हजार २७९ एवढी लोकसंख्या तहानलेलीच असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. सध्या नऊ तालुक्यांमधील ४३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरूनही यंदा उन्हाळा संपतानाच पाणीटंचाई जाणवू लागली. मोसमी पाऊस वेळेत दाखल होऊनही अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील ९९ हजार इतक्या लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आंबेगाव, बारामती, भोर, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर, शिरूर आणि वेल्हा अशा सहा तालुक्यांमधील ४३ गावे, २८३ वाड्यांना खासगी ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एकही शासकीय टँकर सुरू नसून सर्व तहानलेल्या गावांना खासगी टँकरनेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सर्वाधिक पाण्याची टंचाई आंबेगाव तालुक्यात असून या ठिकाणी ११ गावांमधील २३ हजार ७९५ बाधितांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी १४ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात सहा गावांमधील १९ हजार ५०० हजारांहून अधिक बाधितांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी दहा विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जुन्नर आणि खेड तालुक्यांमध्ये अनुक्रमे १५ हजार ४८ आणि २८ हजार ७५८ बाधित लोकसंख्या असून संबंधितांना प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या दोन्ही तालुक्यांत १४ आणि नऊ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बारामती, भोर, पुरंदर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक टँकर सुरू असून हवेली तालुक्यात पाच टँकर सुरू आहेत, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. यंदा जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील वाड्यांवर पहिला टँकर सुरू करण्यात आला. त्यानंतर कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली होती. सध्या पाऊस पडत नसल्याने धरणांनी तळ गाठला असून नागरिकांची पाण्यासाठीची वणवण कमी झालेली नाही.