पुणे– तत्कालीन मध्य प्रदेशातील बस्तर हा अविकसित प्रदेश. बस्तरसह दंतेवाडा परिसरात दोन तपांहून अधिक काळ डाॅ. राम गोडबोले वैद्यकीय सेवाकार्य करत आहेत. या कार्यात पत्नी डाॅ. सुनीता यांचाही सिंहाचा वाटा. त्यांच्या कार्यासाठी दोघांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने डाॅ. राम गोडबोले यांच्या वैद्यकीय सेवाकार्याविषयी श्रीराम ओक यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद…

सेवाकार्याची प्रेरणा काय होती?

सेवाकार्याचे बीज बालवयातच रुजले. माझे वडील कूपर इंजिनीअरिंग वर्क्समध्ये ड्राफ्ट्समन होते. पण, त्यांची नोकरी गेल्यानंतर आमच्या आर्थिक परिस्थितीत बराच फरक पडला. वडिलांना कंपाउंडर म्हणून नोकरी मिळाली. आई सातारा पालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. लग्नाच्या वेळी तिचे शिक्षण सातवीपर्यंतच झालेले होते. पण, नंतर तिने जिद्दीने बीए, बीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ती खासगी शिकवण्याही घ्यायची; त्यामुळे बिघडलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास थोडी मदत होऊ शकली. साताऱ्यातील व्यंकटपुरा परिसरातील महिला आईकडे दुःख सांगायला यायच्या. आई ते दुःख शांतपणे ऐकून घेऊन त्यांच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालायची. यामागे लोकांची दुःखं ऐकायला पैसे पडत नसल्याची तिची भावना होती. त्यातूनच मी घडत गेलो.
कार्याला प्रारंभ कसा झाला?

साताऱ्यातील आर्यांग्ल वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ला माझे ‘बीएएमएस’ पूर्ण झाले. तत्पूर्वी, साताऱ्यातील वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कातून काही काम मी करीत होतो. मध्य प्रदेशचा बस्तर हा जिल्हा मागास जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रमावर होता. तेथील आदिवासी समाज भौतिकदृष्ट्या अतिमागास आहे. भौगोलिक दुर्गमतेबरोबरच सुखसोयीविरहित प्रवास आणि या गावाचे अंतर, यामुळे शहरापासून दूर असलेल्या या गावातील कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कायमच हलाखीची. या आर्थिक विवंचनेत गावकरी आजारपणावर कसा खर्च करत असतील, हा विचार करणेदेखील अवघड. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये येथील गावकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून बस्तरमधील दंतेवाडा जिल्ह्यातील गीदम तालुक्यातील बारसूर या गावी मी १९९० मध्ये गेलो. पत्नीनेही माझ्या या कार्यात सहभागी होण्याचे निश्चित केले असल्यामुळे विवाहानंतर लगेचच आम्ही दोघे तेथे गेलो. २००२ पर्यंत १२ वर्षांच्या काळात अपुरी साधनसामग्री आणि नक्षलवादाच्या छायेत राहून हजारो रुग्णांवर उपचार केले. दंतेवाडा, सुकुमा, बीजापूर जिल्ह्यात १५ वर्षांमध्ये ८९ आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन नऊ हजारांहून अधिक आदिवासींची तपासणी केली. त्यांच्यावर उपचारही केले.

वैद्यकीय सेवा कशा प्रकारे द्यायचात?

मुळातच तेथे आरोग्यविषयक जागरूकता नव्हती; आणि असली तरी पुरेसा पैसा गाठीशी नव्हता. तेथे दवाखान्याची इमारतच काय, खोलीही नव्हती. तेव्हा वनवासी कल्याण आश्रम पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्यांच्या आर्थिक हातभारामुळे रुग्णांवर उपचार करता आले. तेव्हा मी झाडाखाली दवाखाना भरवायचो. माझ्या वैद्यकीय अभ्यासावर मी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होतो. वडिलांच्या आजारपणामुळे आम्हा दोघांना २००२ च्या अखेरीस महाराष्ट्रात परतावे लागले होते. पुढे २००४ मध्ये वडिलांचे निधन झाले. या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड येथे आम्ही राहिलो आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या आरोग्यरक्षक योजनेच्या प्रांताचे आरोग्यप्रमुख म्हणून काम केले.
पुरेशा सुविधा नसताना सेवा कशी देता?

आमची गरज बस्तरमध्ये असल्याचे आम्हाला जाणवत होते, त्यामुळे २०१० पासून आजपर्यंत आम्ही तेथे राहूनच आरोग्यसेवा देत आहोत. जे रुग्ण गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रस्त असतील किंवा वेगळ्या काही चाचण्या, तपासण्या करण्याची गरज असेल, अशा रुग्णांना आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी न चुकता ७५ किलोमीटरवर असणाऱ्या जगदलपूर किंवा रायपूर येथे घेऊन जावे लागते. त्यासाठीही आर्थिक पाठबळाची गरज असते, तेव्हापासून पुण्यातील ‘कृतज्ञता न्यासा’च्या रमेश कोपरकर यांनी जिवाचे रान केले आहे.

दर महिन्याला काही लाखांच्या घरात रक्कम आमच्यापर्यंत येत होती, आजही येते आहे आणि त्यामुळेच मी या सेवा योग्य प्रकारे देऊ शकतो आहे, हे नक्की! तेथे गेल्यानंतर गावकऱ्यांनी आम्हाला आपलेसे करावे म्हणून सुनीता स्थानिक भाषाही शिकली. तिच्या संवादकौशल्याबरोबरच विविध कौशल्यांचा आणि माझ्या वैद्यकीय कौशल्याचा उपयोग या गावकऱ्यांना होतो. त्यामुळे त्यांचे आयुर्मान सुधारण्यास मदत होते, याचा विशेष आनंद आहे.