पुणे : ‘संगीत निसर्गाच्या रंध्रारंध्रात लपले आहे. त्यामुळे आभासी जगात रमण्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी निसर्गातील संगीताशी एकरूप व्हावे’, असे आवाहन ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी शनिवारी युवकांना केले.
विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या वतीने भिकल्या लाडक्या धिंडा, ज्येष्ठ कृषी तंत्रज्ञान संशोधक श्रीरंगदादा लाड आणि प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर या ‘पद्मश्री’च्या मानकऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी धिंडा बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सहकार भारतीचे पुणे महानगर बँकिंग प्रमुख केतन जोगळेकर आणि मंचच्या संचालक ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.
धिंडा म्हणाले, ‘तारपा हे वाद्य पिढ्यानपिढ्या आम्ही वाजवत आहोत. वाद्याची धुंद ऐकताच आमचे शरीर डोलू लागते आणि पाय थिरकू लागतात. निसर्गातील घटकांपासून बनवलेले हे केवळ वाद्य आमचे दैवत आहे. श्वास फुंकून आम्ही हे वाद्य जिवंत करतो.’
लाड म्हणाले, ‘सुपीक जमिनीतून अधिक प्रमाणात आपण धान्य पिकवू शकतो. त्यासाठी संशोधन आवश्यक आहे. मी स्वतः ज्वारी, बाजरी, कपाशी यांच्यावर प्रयोग करून प्रती एकरी अचंबित करणारे उत्पादन घेतले आहे. कृषी संशोधन हा देशसेवेचाच एक भाग असून संशोधनाअभावी केली जाणारी शेती ही कोरडवाहू शेती आहे. आपल्या देशाचा प्रत्येक शेतकरी हा बागायतदार व्हावा, असे माझे ध्येय आहे.
खेडकर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रांत झालेल्या मोठ्या बदलांचा परिणाम तमाशा या लोककलेवर देखील झाला आहे. मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मनोरंजन आणि प्रबोधन अशा दोन्ही आघाड्यांवर काम करणारा तमाशा आता नवीन पिढीपासून तुटत आहे.’
प्रभुणे म्हणाले, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, हजारो वर्षांपासून चालत आलेली आपली भाषा, पेहराव, संस्कृती अशा अनेक गोष्टी आपण विसरून गेलो आहोत. पाश्चात्य शिक्षण पद्धतीने आपली मूळ विचार खरवडून टाकले आहेत. सर्व पातळ्यांवरचे हे पारतंत्र्य आता आपण झुगारून टाकले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपण पुन्हा एकदा आपल्या देशात आपली भाषा, आपली संस्कृती, आपला पेहराव अशा बाबतीत स्वतंत्र होण्याचे ध्येय आपण ठेवले पाहिजे. आपण ज्यांना मागास समजतो, ते आपल्या तुलनेत विचार, बुद्धी, संस्कृती आणि परंपरा अशा सर्व बाबतीत अधिक संपन्न असतात.’
तारपा वादनाला रसिकांची दाद
पुणेकरांसाठी बरोबर आणलेले तारपा हे वाद्य भिकल्या लाडक्या धिंडा वाजवून दाखवताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तारपाच्या तालावर स्वतः नृत्य करीत त्यांनी रसिकांची मने जिंकली. उभे राहून टाळ्या वाजवत पुणेकरांनी त्यांना अभिवादन केले.

