पुणे : ‘गुरूंच्या नावाने मिळणारा पुरस्कार एकाच वेळी आनंददायी आणि जबाबदारीची जाणीव देणारा आहे. गुरू मोगुबाई कुर्डीकर यांचा सहवास गंगेप्रमाणे पावित्र्य देणारा होता. ते भाग्य मला लाभले, याचे ऋण मला जन्मोजन्मी वाटेल,’ अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर यांनी शनिवारी व्यक्त केली.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित ‘गानसरस्वती महोत्सवा’त पद्मा तळवलकर यांना ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’, पं. राजा काळे यांना ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्कार’, तबलावादक पं. रामदास पळसुले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरू पुरस्कार’, तर युवा संतूरवादक डॉ. शंतनु गोखले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार’ आणि डॉ. राधिका जोशी यांना ‘अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी तळवलकर बोलत होत्या. किशोरीताईंचे पुत्र बिभास आमोणकर, निहार आमोणकर, प्रतिष्ठानाचे विश्वस्त पं. रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, संपदा बेलवलकर आदी या वेळी उपस्थित होते.

तळवलकर म्हणाल्या, ‘मोगुबाईंकडे शिकण्याचे भाग्य मला पं. वामनराव देशपांडे यांच्यामुळे मिळाले. सुरुवातीला मोगुबाईंनी एक वर्षासाठी शिकविण्याचे मान्य केले होते. पण, पुढे हे विद्यादान सलग सहा वर्षे चालले. माईंचा वक्तशीरपणा, कलेप्रति कमालीची निष्ठा, प्रेम मला जवळून अनुभवता आले. तेव्हा माई ७५ वर्षांच्या होत्या. पण, तालमीच्या ठरलेल्या वेळा त्यांनी कधीच चुकवल्या नाहीत. त्यांच्यासमोर बसून शिकणे हा मला भाग्ययोग वाटतो आणि त्यासाठी जन्मोजन्मी मी ऋणी राहीन.’

असे आहे पुरस्काराचे स्वरूप

कलाकारांच्या सातत्यपूर्ण संगीत सेवेकरिता नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने ‘गानसरस्वती महोत्सवा’त दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. ७५ हजार रुपये व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्काराचे, ५१ हजार रुपये व मानपत्र असे गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्काराचे, २५ हजार रुपये व मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरु पुरस्काराचे तर २० हजार रुपये आणि मानपत्र असे गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्काराचे स्वरूप आहे. २० हजार रुपये आणि मानपत्र असे अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्काराचे स्वरूप आहे.