पुणे जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदार संघात आतापर्यंत पेड न्यूजची ४६ प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामध्ये सर्व उमेदवरांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्याबरोबरच दहा प्रकरणांत पेड न्यूज असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्या पेड न्यूजचा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्य़ातून प्रसिद्ध होणारी दैनिके आणि वृत्तवाहिन्यांवर पेड न्यूज दिली जाते का, यावर निवडणूक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी अल्पबचत भवन येथे स्वतंत्र पेड न्यूज कक्ष स्थापन केला आहे. या ठिकाणाहून जिल्ह्य़ातील सर्व वृत्तपत्र आणि वाहिन्या पाहण्याचे काम सुरू आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी स्वत:हून सर्व वृत्तपत्र आणि वाहिन्यांवरील बातम्या तपासण्याचे काम करीत आहेत. त्याबरोबरच संबंधित विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी पेड न्यूजवर लक्ष ठेवून आहेत. त्यांना एखाद्या बातमी पेड न्यूज असल्याचा संशय आल्यास त्या बातम्यांची कात्रणे काढून ती पेड न्यूज संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीकडे पाठविली जातात. पेड न्यूज कक्षाकडे आलेल्या प्रकरणांपैकी ४६ प्रकरणांत पेड न्यूज असल्याचा संशय समितीने घेतला आहे. त्या प्रकरणी संबंधित उमेदवारांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्याबरोबरच दहा प्रकरणांत पेड न्यूज असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या उमेदवारांनी दिलेल्या पेड न्यूजचा खर्च निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.