इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन तलाव सध्या देशी-विदेशी पक्ष्यांच्या वर्दळीने गजबजून गेला आहे. देखण्या चित्रबलाक पक्ष्यांनी येथे विणीच्या हंगामासाठी मोठी लगबग सुरू केली असून, तलावातील पाण्याने वेढलेल्या काटेरी बाभळीच्या झाडांवर त्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे.

दर वर्षी नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका वाढताच उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात चित्रबलाकांचे आगमन होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पक्षी भादलवाडी तलावातील पाण्यात उभ्या असलेल्या काटेरी बाभळीच्या झाडांची निवड करतात. सध्या तलावात पुरेसा पाणीसाठा असल्याने शेकडो चित्रबलाकांनी येथे घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. काही मादी पक्ष्यांनी अंडी घातल्याचेही आढळून आले आहे. नर आणि मादी दोघे मिळून घरट्यांची बांधणी आणि पिलांच्या संगोपनासाठी परिश्रम घेत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. पुढील काही महिने हे पक्षी येथेच मुक्काम करून पिलांचे संगोपन करतात. पिलांची पंखे बळकट झाल्यानंतर हे पक्षी पुढील प्रवासासाठी उड्डाण करतात.

पर्यटकांची वाढती गर्दी

उजनी जलाशयाप्रमाणेच भादलवाडीचा हा तलावही आता पक्षी पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. ब्रिटिशकालीन बांधकाम असलेल्या या तलावात दाट काटेरी झुडपे, त्यांवर वसलेले चित्रबलाक, राखी बगळे, पाणकावळे, करकोचे, शेकाट्या, तसेच विविध जातींचे पानपक्षी पाहायला मिळतात. त्यामुळे पक्षिनिरीक्षकांसह निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.

भादलवाडी तलाव हा चित्रबलाकांसाठी सुरक्षित अधिवास मानला जातो. गेल्या काही वर्षांत येथे पक्ष्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, या परिसराचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. तलावातील काटेरी झाडे जतन करणे आणि पाणीसाठा कायम राहील, यासाठी वेळोवेळी खडकवासला कालव्यातून पाणी सोडणे गरजेचे आहे. उजनी परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी भादलवाडी तलाव हेही महत्त्वाचे आकर्षण ठरत आहे.- डॉ. अरविंद कुंभार, पक्षिनिरीक्षक