जेजुरी: खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आज माघी पौर्णिमा यात्रेत कोळी बांधवांनी वाजत-गाजत चांदीच्या पालख्यांच्या मिरवणुका काढल्या यामुळे सारी जेजुरी नगरी भक्तीमय होऊन गेली. दरवर्षी माघ पोर्णिमा यात्रेसाठी कोळी बांधव मोठ्या प्रमाणात येतात तर तीन वर्षांनी चांदीच्या पालख्या जेजुरीत खंडोबाच्या भेटीसाठी आणल्या जातात.यावर्षी होळकरांच्या ऎतिहासीक चिंचेच्या बागेत भव्य आकर्षक मंडप अनेक भागातून पालख्या उतरवण्यात आल्या आहेत.बागेला कोळी वाड्याचे स्वरुप आले आहे.
हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणूक: आयात उमेदवाराचा प्रचार करणार नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर!
“येळकोट येळकोट जय मल्हार ” असा जयघोष करीत सर्व पालख्यांच्या मिरवणुका निघाल्या. यावेळी मिरवणुकीत आधुनिक व पारंपारिक वाद्यवृंदा च्या तालावर खंडोबाची गाणी व कोळी गीते म्हणत महिला व पुरुष भक्त नाचत होते.पौष पौर्णिमेला खंडोबाचे लग्न झाल्यानंतर माघ पौणिर्मेला लग्नाची वरात निघाल्याची आख्यायिका सांगितली जाते. गेल्या दोन दिवसांपासून ऐतिहासिक चिंचेच्या बागेत अलिबाग, वर्सोवा, थळ, खारदांडा, मुरुड, रेवदांडा,रेवस आदी गावातून पालख्या आल्या आहेत. कोळी बांधव आल्याने बाग गजबजून गेली. बागेत केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, उपहारगृहे, खेळणी आदी दुकाने थाटल्याने या परिसराला छोट्या गावाचेच स्वरुप आले आहे. ‘आमचे जीवन कष्टाचे आहे. व्यवसायातील सुख, दु:खे, प्रापंचिक अडचणी सारे काही विसरुन आम्ही या यात्रेत सहभागी होतो’, असे कोळी बांधवांनी सांगितले. सोमवारी (दि. ६) संगमनेरचे होलम व सुप्याचे खैरे आणि जेजुरीचे होळकर यांच्या मानाच्या काठ्या इतर प्रासादिक काठ्या खंडोबा मंदिराला भेटल्यानंतर दुपारी यात्रेची सांगता होणार आहे.