एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी या एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. चौहान यांच्या नियुक्तीवरून एफटीआयआयमध्ये नकारात्मक वातावरण तयार झाले असून, या स्थितीत संस्थेमध्ये काम करू शकत नसल्याचे सांगत पल्लवी जोशी यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे पत्र पाठवून सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मंत्रालयाकडून अद्याप त्यांना कोणतेही उत्तर आलेले नाही.
एफटीआयआयमध्ये सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही. मात्र, या शिवाय विद्यार्थ्यांकडे दुसरा कोणता पर्यायदेखील नाही, असेही पल्लवी जोशी यांनी म्हटले आहे. चौहान यांच्या नियुक्तीच्या निर्णयावर कोणतीही टिप्पणी करण्यास पल्लवी जोशी यांनी नकार दिला.
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार एफटीआयआय सोसायटीचे सदस्य आहेत. यामध्ये विद्या बालन, राजकुमार हिरानी यांचा समावेश आहे.