वाढती महागाई आणि डाळी व भाज्यांचे गगनाला भिडलेले भाव याच्या झळा थेट आषाढी वारीतील वारकऱ्यांना बसत आहे. संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे पंढरीकडे निघाले असून या सोहळ्यात शेकडो दिंडय़ा सहभागी होत आहेत. या दिंडय़ांना भाज्या व डाळींच्या भडकलेल्या दरांमुळे स्वयंपाकात कोणते पदार्थ ठेवायचे असा प्रश्न दिंडीचालकांपुढे आहे.
आळंदीहून निघणाऱ्या ज्ञानेश्वर माउलींच्या आणि देहूतून निघणाऱ्या संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी बांधव सहभागी झाले आहेत. ही संख्या पंढरपूपर्यंत वाढत जाते. याशिवाय राज्याच्या विविध भागातूनही मोठय़ा प्रमाणात पालख्या िदडय़ांसह पंढरपूरकडे पायी निघाल्या आहेत. अनेक भागात पावसाअभावी पेरण्या झालेल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मात्र तरीसुद्धा आषाढी वारी चुकवायची नाही या भावनेने वारकरी निघाले आहेत. दुष्काळाने त्रस्त झालेल्या वारकरी बांधवांना महागाईच्याही झळा बसत
आहेत.
आळंदी ते पंढरपूर या २२ दिवसांच्या प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी दिंडय़ा मोकळ्या मदानात तंबू टाकून किंवा शाळा,महाविद्यालये, धर्मशाळा पाहून तेथे स्वयंपाक करतात. त्यांच्या बरोबर असणाऱ्या वाहनांमध्ये स्वयंपाकासाठीचा शिधा बरोबर असतो. िदडय़ांमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांची चहा, नाश्ता, दोन वेळचे भोजन व निवासाची व्यवस्था दिंडी चालक करतात. त्यासाठी दरवर्षी ठरावीक वर्गणी (भिशी) िदडी चालकांकडे जमा केली जाते. यंदा मात्र महागाईमुळे अनेक दिंडय़ांच्या वर्गणीमध्ये नाइलाजास्त वाढ करावी लागली आहे. डाळी व सर्वच भाज्यांचे भाव वाढल्याने भोजनात नेमके काय पदार्थ ठेवायचे, असा प्रश्न दिंडी चालकांना पडला आहे. तूर डाळीचा दर २०० रुपये किलोवर पोहचला असून मूग, मसूर, हरभरा या डाळींचेही दर १५० रुपयांपर्यंत आहेत. शंभर रुपये किलो प्रमाणे कडधान्य मिळते. सर्वात सोपा व झटपट होणारा पदार्थ म्हणजे आमटी भात. परंतु डाळींचे भाव भडकल्याने आमटीसाठीही मोठा खर्च येणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या पिठले भाकरीसाठी लागणारे डाळीचे पीठही (बेसन) १०० ते ११० रुपये किलो झाले आहे.
दुष्काळ आणि उत्पादन घटल्यामुळे गेल्या महिन्यापासून भाजीपाल्याचेही भावही चढते राहिले आहेत. त्यात प्रामुख्याने टोमॅटो, गवार, भेंडी, घेवडा, तोंडली आदी भाज्या ८० ते १०० रुपये किलो , तर हिरवी मिरची व शेवगा १०० ते १२५ रुपये किलो आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, पालक, मेथीचे दर चांगलेच वाढले आहेत. त्या तुलनेत कांदे-बटाटे, दुधी भोपळा, पडवळ, डांगर, कोबी यांचे भाव आवाक्यात आहेत. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी विविध संस्था, मंडळे आणि ग्रामस्थांकडून वारकरी बांधवांसाठी भोजन प्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र महागाईमुळे िदडी चालक व सेवाभावी संस्थांचा खर्च वाढणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा खर्चात दीडपट वाढ झाली आहे.
प्रकाश खाडे