पुणे : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेची व्याप्ती वाढवण्यासह अनुदान रकमेचे दर वाढवण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता दहावीनंतर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी राज्यातील शासनमान्य शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजना लागू करण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. विविध अभ्यासक्रमांसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने त्या प्रमाणात शासकीय वसतिगृहांती प्रवेश क्षमता उपलब्ध नाही. त्यामुळे २०१६-१७या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेणाऱ्या, परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबवण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्यासाठी आधार संलग्न खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येते. सध्या इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण किंवा इयत्ता दहावीनंतरच्या दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या, परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या दराने प्रतिवर्ष ठोक रक्कम डीबीटीद्वारे जमा करण्यात येत आहे.

मात्र, योजनेतील अनुदानाचे दर सन २०१८ मध्ये निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानंतर त्यात  वाढ करण्यात आलेली नाही. आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती विचारात घेता,  महागाई निर्देशांकाचा विचार करता सदर योजनेंतर्गत देय असलेल्या भत्त्यांच्या रकमेत वाढ करणे, शासकीय वसतिगृहांची मर्यादित विद्यार्थी क्षमता, विद्यार्थ्यांचा विविध अभ्यासक्रमांकरिता वाढता कल लक्षात घेता सदर योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नव्या निर्णयानुसार इयत्ता दहावीनंतर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी राज्यातील शासनमान्य शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अनुदानाची सुधारित रक्कम

योजनेअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष भोजन भत्त्यासाठी ४२ हजार, निवास भत्त्यासाठी २८ हजार रुपये, निर्वाह भत्त्यासाठी १० हजार रुपये असे एकूण ८० हजार रुपये दिले जाणार आहेत. इतर विभागीय मुख्यालये, ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ३७ हजार रुपये, निवास भत्ता २१ हजार रुपये, निर्वाह भत्ता १० हजार रुपये असे एकूण ६८ हजार रुपये मिळतील. इतर जिल्ह्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ३२ हजार रुपये, निवास भत्ता १७ हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये, असे एकूण ५७ हजार रुपये अनुदान देण्यात येईल.

राज्यातील इतर ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता ३० हजार रुपये, निवास भत्ता १३ हजार रुपये आणि निर्वाह भत्ता सात हजार रुपये, असे एकूण ५० हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत. याशिवाय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याकरिता प्रतिवर्ष आठ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये ठोक स्वरूपात देण्यात येणार आहेत. सर्व लाभ थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.