पुणे : वैयक्तिक आयुष्यात एवढ्या नाट्यमय घटना घडलेल्या असतानाही त्यावर मात करून आपली नाममुद्रा प्रस्थापित करून रसिकांशी ‘ऋणानुबंधाच्या गाठी’ जोडणारे मूर्धन्य गायक पं. कुमार गंधर्व यांच्याविषयीचे एक वेगळे रसग्रहण हिंदी पुस्तकामध्ये शब्दबद्ध झाले आहे. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आजपासून (७ एप्रिल) संगीताचे अभ्यासक विनय हर्डीकरलिखित हे पुस्तक वाचकांच्या हाती पडणार आहे.

‘देशमुख आणि कंपनी’ प्रकाशन संस्थेने हा योग जुळवून आणला आहे. ‘कुमार गंधर्व के पुनर्जन्म : लौकिक तथा सांगीतिक तीन प्रस्तुतियाँ’ या विनय हर्डीकर यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाची मुखपृष्ठासह मांडणी प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केली आहे. त्याला पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य आणि ज्येष्ठ गायक-संगीत अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे.

हर्डीकर म्हणाले, ‘माझी आई आणि मामा राजाभाऊ इनामदार यांच्यामुळे कुमार गंधर्व यांचा परिचय झाला. मी १९६५ मध्ये कुमारांचे गायन पहिल्यांदा ऐकले. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर बांधून झाल्यावर ‘भवानराव पंतप्रतिनिधी स्मृती समारोहा’मध्ये कुमारजींच्या झालेल्या मैफलीचा मी एका श्रोता आहे. वयाच्या आठव्या वर्षी एक मुलगा गायला लागला, बाराव्या वर्षी त्याला प्रो. बी. आर. देवधर यांच्यासारखा गुरू लाभला, आजारपणामुळे पाच-सहा वर्षे गायनापासून दूर राहण्याची आलेली वेळ, पत्नीचे निधन, विद्यार्थिनीशी केलेला विवाह, मुलाच्या आयुष्यातील संक्रमणे एवढ्या नाट्यमय घडामोडींचा सामना करताना त्यांनी आपल्या कलात्मक सृजनशीलतेवर परिणाम होऊ दिला नाही. उलट, त्या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या गायनामध्ये प्रभावीपणे उमटले. ख्याल गायकी, लोकसंगीत, भजन आणि उपशास्त्रीय गायनातून कुमरजी कसे दिसले, हे मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.’

‘कानडी प्रदेशातून आलेले कुमार गंधर्व हे गायक मध्य प्रदेशातील माळवा प्रांतामध्ये स्थायिक झाले. त्या भागाशी जणू ते स्थानिक असल्याप्रमाणे एकरूप झाले. ख्याल गायकीमध्ये शब्द तुलनेने गौण असतात. पण, भक्तिरचनेमध्ये शब्दांना गौण करून चालत नाही. त्यामुळे भजन गायनातील शब्दांचे महत्त्व आणि अभिजात संगीतातील रागाची शिस्त याचा अनोखा मिलाफ त्यांच्या गायकीमध्ये होता,’ असे हर्डीकर यांनी सांगितले.

हे पुस्तक म्हणजे पं. कुमार गंधर्व यांची वैयक्तिक आणि कलात्मक कारकीर्द मांडणारे चरित्रात्मक लेखन नाही. स्वरमंचावरून सादर होणाऱ्या कलाविष्कारामागची पं. कुमार गंधर्व यांची वैचारिक भूमिका अधोरेखित करून त्यांच्यातील तत्त्वज्ञ कलाकार उलगडणारे वेगळ्या प्रकारचे रसग्रहण आहे. – विनय हर्डीकर, लेखक-संगीत अभ्यासक