शिरुर: पंडितोत्सव २०२५ हा सांस्कृतिक  सोहळा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कस्तुरी शिक्षण संस्था येथे होणार आहे. संगीत आणि नृत्याच्या अभिजात परंपरेचा आनंद घेण्यासाठी  या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ . प्रतिक पंडितराव पलांडे यांनी केले आहे .पलांडे यांनी सांगितले की भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य ही कलाक्षेत्रातील समृद्ध परंपरा असून  ही कला ग्रामीण भागात रुजावी आणि लोकांना शास्त्रीय संगीत व नृत्य समजून घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने प्रतिमा फाउंडेशनने २०२४ मध्ये पंडितोत्सव या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. महाराष्ट्रातील पहिल्या ग्रामीण शास्त्रीय कला मंचाच्या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाला टाटा हेंड्रिकसन सस्पेन्शन लिमिटेड यांचा पाठिंबा आहे.

सन २०२४ मधील पंडितोत्सवला  मोठा प्रतिसाद मिळाला. १५०० हून अधिक प्रेक्षकांनी हा सोहळा अनुभवला. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, पद्मश्री सुरेश तळवळकर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नृत्यांगना ऋजुता सोमण यांच्या उपस्थिती या सोहळास  होती . यंदाच्या पंडितोत्सव – २०२५  तीन विशेष भागांमध्ये साजरा होणार आहे. या सोहळ्याचा पहिला भाग म्हणजे कलाकार सादरीकरण.यात ज्येष्ठ शास्त्रीय गायक आनंद भाटे व प्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर आपल्या मधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

दुसऱ्या विभागात पुरस्कार समारंभ होणार असून, यामध्ये  कथ्थक नृत्यातील ज्येष्ठ गुरू शामा भाटे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यात येणार आहे . मागील  पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी नृत्य साधना केली असून, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले आहे. दुसरा पुरस्कार कला साधना पुरस्कार, सुप्रसिद्ध कीबोर्डवादक आणि संगीतकार अभिजित पोहनकर यांना प्रदान केला जाणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला आधुनिक स्पर्श देणाऱ्या अभिजित पोहणकर यांनी ‘पिया बावरी’ यांसारखी अनेक लोकप्रिय गीते दिली आहेत.

या सोहळ्याचा तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थी सादरीकरण. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शास्त्रीय कलेची गोडी लागावी, म्हणून प्रतिमा फाउंडेशनच्या ग्रामीण मॉडेल शाळांमध्ये संगीत आणि नृत्य शिक्षण दिले जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून  विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंदी आणि  स्वातंत्र्य सैनिक  शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे खालसा हिवरे कुंभार या स्थानिक शाळांतील विद्यार्थीही यंदा पंडितोत्सव २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत, एकूण २०० हून अधिक विद्यार्थी आपली कला सादर करणार असून, यात कथ्थक व गायन चा समावेश असेल असे डॉ . पलांडे यांनी सांगितले .