लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर एमएनजीएलच्या वाहिनीतून गॅस गळती झाल्याने घबराट उडाली. शुभम हॉटेलजवळील गल्लीत महापालिकेडून मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना एमएनजीएलच्या वाहिनीला धक्का बसल्याने गॅसगळती सुरू झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान आणि एमएनजीएलच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखली.

जंगली महाराज रस्त्यावर शुभम हॉटेलशेजारी असलेल्या गल्लीत महापालिकेडून मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू होते. दुपारी पावणेबाराच्या यंत्राच्या सहायाने खोदाई करण्यात येत होती. तेथील एमएनजीएलच्या वाहिनीला धक्का बसल्याने मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. गॅस गळतीमुळे परिसरात घबराट उडाली. गॅसचा वास पसरल्याने शुभम हॉटेलमधील ग्राहक बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्रातील तांडेल प्रवीण रणदिवे, ज्ञानेश्वर खेडेकर, किशोर बने, शंकर सोनवणे, अक्षय भोळे, फैजल कसबे, कुणाल वाघवले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आणखी वाचा-पुणे जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचे लक्षच नाही, रोहित पवारांचा पालकमंत्री अजित पवारांना टोला

एमएनजीएलच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी भेट दिली. एमएनजीएलच्या वाहिनीतून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू असल्याने मुख्य वाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आल्याने गॅसगळती सुरू झाली. व्हॉल्व बंद केल्याने गॅसगळती कमी झाली. मात्र, वाहिनीत गॅस साठून राहिला होता. त्यानंतर महापालिकेच्या कामगारांनी पुन्हा काम सुरू केले. जेसीबी यंत्राचा धक्का लागल्याने वाहिनीतील गॅसने पेट घेतला. त्यामुळे घबराट उडाली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्रातील तांडेल प्रवीण रणदिवे यांनी दिली.

गॅसगळतीमुळे दुकाने बंद

गॅसगळतीमुळे जंगली महाराज रस्त्यावर घबराट उडाली. परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. दुकान, तसेच हॉटेलमधून नागरिक बाहेर पडले.