पिंपरी : ‘नदीसुधारचे काम वेगळे आहे. नदीची सुधारणा करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणताही विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. राज्यातील सर्व नद्या प्रदूषणमुक्त केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची रावेत येथे मंत्री मुंडे यांनी शुक्रवारी पाहणी केली. नदी प्रदूषणाची कारणे जाणून घेतली. महापालिका पाणी उचलत असलेल्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राची आणि इंद्रायणी नदीवरील निघोजेतील बंधाऱ्याची त्यांनी पाहणी केली. महापौर रवि लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे या वेळी उपस्थित होते.

शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीसुधारच्या कामाला विरोध होत आहे. विरोध डावलून नदीसुधार प्रकल्प केला जाणार आहे का, याबाबत विचारले असता मुंडे म्हणाल्या, ‘नदीसुधारचा विषय वेगळा आहे. त्यामुळे त्यावर मी कोणतीही टिप्पणी करणार नाही. परंतु, कोणताही विकास पर्यावरणाचा ऱ्हास करणारा असेल, तर कारवाई केली जाईल.’

‘नद्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन केले आहे. केंद्र शासनाने सर्वाधिक प्रदूषित नद्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. राज्यातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या नद्या प्राधान्याने स्वच्छ केल्या जाणार आहेत.

नदीच्या उगमापासून शेवटपर्यंतचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. इंद्रायणी नदी स्वच्छतेचा आराखडा यापूर्वीच तयार झाला आहे. पवना नदीच्या प्रदूषणाचा आराखडाही तयार करण्यात येत आहे. पवना नदीच्या पाण्यात सांडपाणी, रसायनमिश्रित किंवा औद्योगिक पाण्याचे प्रमाण जास्त आहे का, याचा अभ्यास केला जात आहे.’ पवना नदीसह राज्यातील सर्व नद्यांचे टप्प्याटप्प्याने पुनरुज्जीवन केले जाणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.