गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळात आझम पानसरे यांचा पराभव, त्यापाठोपाठ चिंचवड विधानसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांचा पराभव, महापालिका निवडणुकीत राहुल कलाटे यांची ‘नाकाबंदी’ अशा अनेक गोष्टी घडल्या, त्यातून सुरू झाले सूडनाटय़ व त्याच्या केंद्रस्थानी होते आमदार लक्ष्मण जगताप! पराभवाचा वचपा काढण्याच्या समान ध्येयाने झपाटलेली ही मंडळी मावळ लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आली व त्यांना इतरांकडून मदतीचा हात मिळाला. अखेर, बहुचर्चित लढतीत बारणेंच्या बाणातून जगतापांचा ‘वेध’ घेत एक सूडचक्र पूर्ण झाले.
आझम पानसरेंना गेल्या लोकसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यापूर्वी जगतापांनी त्यांना पाठिंबा दिला होता, नंतर नेत्यांच्या सांगण्यावरून ते एकदम स्वत:च इच्छुक झाल्याने त्यांच्यात संघर्ष पेटला व तो निवडणूक संपेपर्यंत वाढतच गेला. पानसरेंचा पराभव झाला. जगतापांनी गजानन बाबरांना मदत केल्याचा ठपका पानसरेंनी ठेवला. पुढे दोहोंतील वाद धुमसत राहिला. त्यातच यंदा जगतापांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल, अशी चिन्हे दिसताच पानसरेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली व काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जगताप राष्ट्रवादीऐवजी शेकापचे उमेदवार झाले. मात्र, पानसरेंनी जगतापांना पराभूत करण्यासाठी आपली यंत्रणा शिवसेनेला जोडली, त्याचा फायदा बारणेंना निवडून येण्यात झाला. जगताप-बारणे गेल्या विधानसभेला आमने-सामने लढले, त्यात बारणे पराभूत झाले. तेव्हापासून दोघातून विस्तव जात नव्हता. महापालिका निवडणुकीत तेढ आणखी वाढली, त्यातच मावळसाठी दोघांचा सामना होणार म्हणून राजकारण सुरू झाले, त्यात चक्रावून सोडणाऱ्या अनेक गुप्त घडामोडी झाल्या. सहाही मतदारसंघातील स्थानिक राजकारण ढवळून काढणाऱ्या व राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलेल्या या लढतीत मोठय़ा मताधिक्याने निवडून येत बारणेंनी पराभवाचे उट्टे काढले. शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे जगतापांचे निकटवर्तीय होते. तथापि, गेल्या विधानसभेनंतर दोहोंत तेढ निर्माण झाली. पालिका निवडणुकीत कलाटे यांच्या मातोश्रींचा वाकडला पराभव झाला, त्यात जगतापांचा पुढाकार होता, या भावनेने कलाटेही पेटले होते. पानसरे, बारणे, कलाटे यांना अनेकांची साथ मिळाली. दोन शहराध्यक्षांनी व्यवस्थित काम दाखवत आपला हेतू साध्य केला. बलाढय़ जगताप मानहानीकारक पराभवाने पुरते खचले. अजूनही त्यांनी पराभवासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. वर्चस्वाच्या लढाईचे हे सूडनाटय़ इथेच थांबणार की यापुढेही सुरूच राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.