८५ टक्के जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी द्या

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांवरून पालकांची मागणी

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांवरून पालकांची मागणी

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांमधील ८५ टक्के जागांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात यावा आणि प्रवेश प्रक्रिया २० सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांमधील वैद्यकीय प्रवेश नीटच्या निकालाच्या आधारे सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाविरोधात अभिमत विद्यापीठे आणि ८५ टक्के प्रवेश सामाईक प्रवेश प्रक्रियेतून करण्याच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतर शासनाने याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या याचिकेची सुनावणी १४ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर राज्यातील वैद्यकीय प्रवेश २० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावेत अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

याबाबत किरण कूर्तकोटी म्हणाले, ‘राज्यात खासगी महाविद्यालयातील प्रवेशासाठी २० हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. विद्यार्थ्यांची  प्रवेश यादी तीन सप्टेंबरला लागणार होती. त्यापूर्वी एक सप्टेंबरला नाशिकच्या एका महाविद्यालयाने ८५ टक्के प्रवेश हे भारतातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात यावेत, अशी मागणी करीत न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती मिळाली. नियमानुसार २६ सप्टेंबपर्यंत प्रवेश प्रक्रिया अपेक्षित असून त्यानंतर रिक्त जागा व्यवस्थापन कोटय़ामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील ८५ टक्के जागा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच मिळाव्यात. त्याचप्रमाणे वैद्यकीय संचालनालयाने विद्यार्थ्यांचे नाव, नीटमध्ये मिळालेल्या गुणांनुसार (स्कोअर) यादी प्रसिद्ध करावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग सुरू झाले आहेत. खासगी महाविद्यालयांचीही प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Parents demand 85 percent sets for maharashtra student