पुण्याच्या मावळ तालक्यातील पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये १८ वर्षांचा अद्वैत वर्मा काही दिवसांपूर्वी बुडून मृत्यूमुखी पडला. आता त्याच्या पालकांनी २३ जुलै रोजी राज्य सरकारविरोधात दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ कायद्याच्या कलम ८० नुसार खटला दाखल केला आहे. जेणेकरून इतर कुणाच्या मुलाचा मृत्यू होऊ नये. अद्वैत वर्मा हा मुळचा दिल्लीचा असून विमान नगर येथील सिम्बॉसिस महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. महाविद्यालयातील त्याच्या मित्रांसह तो पवना धरणावर सहलीसाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला.

पर्यटनस्थळी सूचना फलक असावेत

अद्वैत वर्माचे काका आणि दिल्लीस्थित असलेले वकील सुरेश वर्मा यांनी सांगितले की, पवना धरणाच्या बॅकवॉटरजवळ पर्यटकांना माहिती देणारे फलक लावलेले गेले नाहीत. तिथं जीवाला धोका आहे, असे कुठेही लिहिलेले नाही. त्यामुळे अशा लोकप्रिय पर्यटनस्थळी मुलांचा मृत्यू झाल्यास, फक्त मुलांना त्यासाठी दोष देणे चुकीचे आहे. २३ जुलै रोजी पुण्यातील स्थानिक वकील नितीन कांबळे यांच्यामार्फत राज्य सरकारला नोटीस पाठविण्यात आली आहे. निष्काळजीपणा आणि सुरक्षेचे योग्य उपाय न योजिल्याबद्दल सरकारला दोषी धरण्यात आले आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला आणि ही सरकारची जबाबदारी आहे, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

हे वाचा >> नाशिक : भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू ; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश

लोणावळ्याच्या नजीक पवना धरण आहे. इकडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. येथे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात २० वर्षीय मनीष शंकर शर्मा यांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात २५ वर्षीय मयांक अखिलेश उपाध्याय, जूनमध्ये अद्वैत वर्मा आणि जुलैमध्ये सागर कैलास साठे यांचा याठिकाणी मृत्यू झाला आहे. या सर्वांचाच बुडून मृत्यू झाला.

अद्वैत वर्मा प्रकरणाचे वकील नितीन कांबळे यांनी म्हटले की, आमच्या नोटिशीला उत्तर देताना राज्य सरकार खुल्या जागी सुरक्षारक्षक तैनात करू शकत नाही, असे उत्तर कदाचित देऊ शकते. मात्र सुरक्षारक्षक तैनात नाही केले तरी अशा लोकप्रिय पर्यटन स्थळी जवळच्या पोलीस ठाण्यातून मदत पुरविली गेली पाहिजे. लाईफ जॅकेट, बोट आणि जीवरक्षक अशा परिसरात उपलब्ध केले पाहिजेत, अशी अपेक्षा नितीन कांबळे यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा >> क्षणभराचा आनंद आयुष्यभराच दुख: देऊन जाईल! पाण्याच्या ठिकाणी फिरायला जाण्यापूर्वी हा VIDEO पाहा

नुकसान भरपाई मागणार

वर्मा कुटुंबीयांनी आता राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मागितली आहे. तसेच या विषयावर जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्वैत वर्माच्या पुण्यातील स्थानिक पालक असलेल्या मोनिका बुदकी यांनी म्हटले की, अद्वैत पवना धरणाजवळ सहलीसाठी जात आहे, हे मला माहीत असते तर मी त्याला तेथील धोक्याची माहिती दिली असती. मोनिका यांनी म्हटले की, अद्वैतच्या मित्रांनी सहलीची माहिती देताना सांगितले की, पाण्याची पातळी अचानक वाढली. कोणतीही आगाऊ सूचना न देता धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली. ज्यामुळे अद्वैत बुडाला.