पुणे : एकाच स्थितीत बराच वेळ बसल्यानंतर बहुतेकांच्या पायात मुंग्या येतात. कित्येक वेळा पाय इतका जड पडतो की तो उचलणे अशक्य होते. या मुंग्या का येतात, नेमकी कारणे काय आहेत, याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली. पायाला मुंग्या येण्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची वेळीच काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.आरोग्यतज्ज्ञांनी या बाबात सांगितले, ‘खूप वेळ बसल्यानंतर पायांना मुंग्या येणे ही एक सर्वसामान्य बाब मानली जाते.

बहुतांश जणांमध्ये जमिनीवर मांडी घालून बसल्यावर अथवा खुर्चीत पाय सोडून बसल्यावर काही काळानंतर मुंग्या यायला सुरुवात होते. काही जणांमध्ये, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये, पाय बधीर होणे, सुन्न होणे, प्रसंगी खुर्चीवर खूप वेळ बसल्याने पायाला सूज येणे अशी लक्षणेही दिसतात. शरीरात असणाऱ्या विविध कमतरता या माध्यमातून दर्शवल्या जातात. बऱ्याच वेळा सर्वसामान्यपणे जीवनसत्त्वांची कमतरता, कॅल्शियमची कमतरता तसेच अशक्तपणामुळेदेखील पायांना मुंग्या येतात. जीवनसत्त्वांची कमतरता, अनियंत्रित मधुमेह, मद्यपान आणि तंबाखूचे अतिसेवन, मूत्रपिंडाचा विकार, चुकीच्या पद्धतीने बसणे या कारणांमुळेही पायांना मुंग्या येतात.’

काय काळजी घ्याल ?
वैद्यकीय तज्ञांच्या मते

  • एकाच स्थितीत दीर्घकाळ बसू नये
  • भरपूर भरपूर पाणी आणि संतुलित आहार घ्यावा
  • मुंग्या येत असल्यास पायांची हालचाल करावी
  • पाय बधिर झाले असतील तर सावकाश पाय हलवणे पायांच्या बोटांना हातानेच मसाज करणे
  • मुंग्यांबरोबरच थकवा आणि वेदना जाणवत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला देणे

डॉक्टरांचे म्हणणे काय ?

दीर्घ काळ अनियंत्रित मधुमेह असल्यास त्याचा परिणाम पायांच्या नसांवर आणि रक्ताभिसरण व्यवस्थेवर होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा पायांच्या नसांची व रक्ताभिसरणाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.’ अशी माहिती के. ई. एम. रुग्णालय मधुमेह आणि निद्राशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्मिता धाडगे यांनी दिली.

हल्ली हाता-पायाला मुंग्या येण्याचे प्रमाण वाढण्यामागे बदललेली जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन आणि व्यायामाचा अभाव ही काही प्रमुख कारणे आहेत. आहार सुधारणे, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी सवयींचे पालन करणे हाच यावर सर्वांत प्रभावी उपाय ठरतो. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जाणीवपूर्वक समावेश केल्यास त्याचा चांगला उपयोग होईल. असे सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जोशी यांनी सांगितले

मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. अरुण मुंडे या विषयी माहिती देताना सांगितले की,पायांना मुंग्या येणे हे मूत्रपिंडविकाराचे एक लक्षण असू शकते. ज्यांना किडनीचा त्रास आहे, त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.