पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी विद्यार्थी नोंदणीसाठी शिक्षण विभागाची धावाधाव सुरू आहे. राज्यासाठी ६५ लाख विद्यार्थी, शिक्षक पालकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना आतापर्यंत केवळ जेमतेम पावणेतीन लाखच नोंदणी झाल्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याला दिलेले विद्यार्थी, शिक्षक पालक नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. ‘परीक्षा पे चर्चा ९’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत https://innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी ऑनलाइन एमसीक्यू स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याबाबत ३ डिसेंबर आणि ८ डिसेंबरच्या परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले होते.
त्या अनुषंगाने विभागातील, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या निदर्शनास आणून ‘परीक्षा पे चर्चा ९’ मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, तसेच पालकांनी यात सहभागी होण्यासाठी सूचित करून त्याचा अहवाल संचालनालयास सादर करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा ९’ या कार्यक्रमामध्ये एकूण ६५ लाख विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सहभागी होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. मात्र, २२ डिसेंबरपर्यंत २ लाख ७८ हजार ५३५ विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी ‘परीक्षा पे चर्चा ९’ कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे राज्याच्या नोंदणीबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सहसचिवांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे डॉ. पालकर यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘परीक्षा पे चर्चा ९’ या कार्यक्रमामध्ये एकूण ६५ लाख विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची राहील. त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील मुख्याध्यापक, क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास पाठवावा, असेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे परीक्षा पे चर्चा कार्यक्रम?
परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेला कार्यक्रम आहे. तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याबाबत या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाते. यात पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात. या संवादाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, रेडिओ अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे केले जाते.
