मतदान कराच.. मतदार जागृतीसाठी ‘परिवर्तन’ ची मोहीम

अठरा दिवसांच्या मतदार जागृती मोहिमेत पुण्यातील अनेक ठिकाणी विविध माध्यमांचा वापर करून तरुणांनी स्थापन केलेली परिवर्तन ही संस्था‘मतदान करा’ असा प्रचार करणार अाहे.

येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. अठरा दिवसांच्या मतदार जागृती मोहिमेत पुण्यातील अनेक ठिकाणी विविध माध्यमांचा वापर करून ‘मतदान करा’ असा प्रचार केला जाणार आहे. तरुणांनी स्थापन केलेली परिवर्तन ही संस्था ही मोहीम राबवणार असून असाच उपक्रम युवक-युवतींनी महापालिका निवडणुकीतही केला होता आणि त्याला यशही मिळाले होते.
मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत आहे का, याचा शोध घ्यावा आणि यादीत नाव नसेल, तर यादीत नाव समाविष्ट करावे अशी मोहीम ‘परिवर्तन’ च्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्यात केली. या मोहिमेत संस्थेचे कार्यकर्ते पंचावन्न हजार नागरिकांपर्यंत पोहोचले आणि ज्यांची नावे यादीत नव्हती अशांची नावे यादीत समाविष्ट करण्यात कार्यकर्ते यशस्वी झाले. परिवर्तनचा पुढचा टप्पा व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम राबवण्याचा आहे आणि ही मोहीम मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेची तयारी सध्या कार्यकर्ते करत असून ही मोहीम विविध माध्यमांचा वापर करून राबवली जाणार आहे.
अठरा दिवसांच्या या मोहिमेत शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर आणि सर्व प्रमुख चौकांमध्ये मतदानाची आवश्यकता या विषयाची जागृती करणारी पथनाटय़ सादर केली जातील. तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी भित्तिपत्रकांचे प्रदर्शन, पत्रके वाटप असेही कार्यक्रम होतील. पुणेकर ज्या ठिकाणी मोठय़ा संख्येने रोज एकत्र येतात अशा ठिकाणी देखील मोहीम राबवली जाईल. त्यात प्रामुख्याने सकाळच्या वेळात टेकडय़ांवर तसेच बागा व अन्य गर्दीच्या ठिकाणी देखील पथनाटय़ सादर केली जातील. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारात तसेच महाविद्यालयांमध्येही ही मोहीम राबवली जाणार आहे. मतदान करा असा संदेश देणाऱ्या वाहनफेऱ्यांचेही आयोजन केले जाणार असून ‘चालता-बोलता’ स्वरूपातील प्रश्नोत्तरांच्या खेळांमधूनही मतदानाविषयीची जागृती केली जाणार आहे. मतदानासंबंधी माहिती देणाऱ्या छोटय़ा फिल्म आणि व्हीडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना पाठवल्या जाणार आहेत. या शिवाय विविध सेवा देणाऱ्या संस्था तसेच उद्योगांशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरून मतदान करा, असे आवाहन करावे, यासाठी देखील प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती परिवर्तनचा अध्यक्ष अनिकेत मुंदडा याने दिली. मतदार जागृतीच्या या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांना परिवर्तनशी ८३०८३०५५११ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

मतदार जागृतीसाठी काय काय..
– मोहिमेत युवक, युवतींचा मोठा सहभाग
– प्रमुख चौकांमध्ये पथनाटय़
– गर्दीच्या रस्त्यांवर भित्तिचित्र प्रदर्शन
– सोशल मीडियाचाही वापर
– मतदानाचे महत्त्व सांगणारे व्हीडीओ
– चालता-बोलता प्रश्नोत्तराचा खेळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Parivartans rally for voters awareness

ताज्या बातम्या