पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपून लाेकप्रतिनिधींची राजवट सुरू हाेत असतानाच महापालिका भवनात वाहन पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा राखीव ठेवावी लागत आहे. अपुऱ्या जागेमुळे अनेक अधिकारी, महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना महापालिका भवनासमाेरील रस्त्यावर वाहने पार्क करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. त्यासाठी सुरक्षा विभागाने शहर अभियंत्यांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सध्याची चार मजली इमारती मुंबई-पुणे महामार्गावरील पिंपरीत आहे. या इमारतीचे १३ मार्च १९८७ राेजी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या इमारतीला ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हाच्या परिस्थितीनुसार महापालिकेत वाहनांच्या पार्किंगचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यानुसार ८० चारचाकी आणि ३२५ दुचाकी वाहने लावता येतील, अशा पद्धतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, नगरसेवकांची संख्या वाढली आहे. शहराची लोकसंख्याही ३० लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयात वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत असून, पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे.

महापालिकेत मागील पावणेचार वर्षांपासून प्रशासकीय राजवट हाेती. त्यामुळे अधिकारी आणि विविध कामानिमित्त महापालिकेत येणाऱ्या नागरिकांची वाहने महापालिका भवन परिसरात लावण्यात येत हाेती. ही जागा अपुरी पडत असताना महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेत नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकांच्या वाहनांसाठी पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. ८० चारचाकीची क्षमता असताना निवडून आलेले १२८ आणि दहा नामनिर्देशित (स्वीकृत) असे १३८ नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे वाहन कोठे लावायचे, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. याचा विचार करून महापालिकेच्या सुरक्षा विभागाने वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र शहर अभियंता मकरंद निकम यांना दिले आहे. सुरक्षा विभागाने पार्किंगसाठी महापालिका भवनाजवळील दाेन जागा भाडेतत्त्वावर घेण्यास सुचविले आहे.

रस्त्यावरील पार्किंगमुळे काेंडी

महापालिका भवनामध्ये वाहनांसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक अधिकारी, विविध कामानिमित्त येणारे नागरिक, ठेकेदार मुंबई-पुणे महामार्ग आणि महापालिकेतून बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर वाहन लावतात. त्यामुळे सेवा रस्त्यावर कोंडी होते. यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक हाेते. काही वेळा वाहतूक पाेलीस ती वाहने उचलून नेतात. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागताे.

नवीन इमारतीला आणखी एक वर्ष लागणार

ऑटो क्लस्टर येथील सात एकर जागेत १३ मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. फर्निचरसह सर्व कामे पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. नवीन इमारतीमध्ये महापालिकेच्या विभागांबरोबर महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची दालने असणार आहेत. चारचाकी ४७९ आणि दुचाकी दोन हजार ७१३ वाहने लावता येतील, असे प्रशस्त वाहनतळ असेल, असे कार्यकारी अभियंता विजय भोजने यांनी सांगितले.

महापालिका इमारतीच्या परिसरात ८० चारचाकी आणि ३२५ दुचाकी वाहने पार्क लावता येतील, एवढीच क्षमता आहे. सद्य:स्थितीत महापालिकेत वाहन पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शहर अभियंत्यांना पत्र दिले आहे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी सांगितले.