लोकसत्ता वार्ताहर
लोणावळा: लोणावळ्यातील कुरंवडे गावात मध्यरात्री एका बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. अश्लील हावभावात महिलांचे नृत्य बंगल्यात सुरू असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दहा जणांविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी श्रेयस शर्मा, लक्ष्मण दाभाडे, (दोघे रा. मुंबई), कैलास पवार, गुरु पाटील (रा. लोणावळा), शिवाजी भोसले, अभिजीत सोनलकर, धनाजी जगताप, संतोष शिंदे, प्रवीण पैलवान, फिरोज तांबोळी (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मनोज मोरव यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणावळ्यातील कुरंवडे गावात शर्मा व्हिला या बंगल्यातून मध्यरात्रीनंतर ध्वनिवर्धकाचा मोठा आवाज येत होता. चित्रपटातील गीतांवर महिला अश्लील हावभाव करुन नृत्य करत होत्या. याबाबतची माहिती लोणावळा शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. शर्मा व्हिला बंगला भाड्याने दिल्याचे चौकशीत उघडकीस आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा परवाना नसताना बंगला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे माहिती चौकशीत मिळाली. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराज पाटणकर तपास करत आहेत.
बंगले बेकायदा भाड्याने
लोणावळा, खंडाळा परिसरात पुणे-मुंबईतील अनेक व्यावसायिक, उद्योजकांचे बंगले आहेत. बंगला भाड्याने देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचा परवाना लागतो. खासगी बंगल्यात मोठ्या संख्येने पर्यटक वास्तव्य करतात. अनेक बंगल्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असून बेकायदा बंगले भाड्याने दिले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहा महिन्यांपूर्वी लोणावळा परिसरातील बंगल्यात जलतरण तलावात बुडून वेगवेगळ्या घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी लोणावळा भागातील बंगले मालकांची बैठक घेऊन सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच नियमांची माहिती बंगले मालकांना दिली होती.