पुणे : पर्वतीमधील शाहू वसाहतीच्या झोपडपट्टी पुनर्वसनाला थेट उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे शाहू वसाहतीचा स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या वसाहतीमधील नागरिकांनी एकत्र येत त्यासाठी दिलेल्या लढ्यालाही या निर्णयामुळे यश आले आहे.

पर्वती येथील स. नं. ९२ पैकी फायनल प्लॉट नं. पै. व स. नं. ९३ पैकी फायनल प्लॉट न. ५११ पैकी ५११ अ . पै. ५११ ब पै.येथे गेल्या पन्नास वर्षांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून येथील घरे ही दुमजली पक्की स्वरूपाची आहेत. मात्र, एका बिल्डर्ससाठी एसआरए स्कीम राबविण्यासाठी झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा झोपडपट्टी पुनर्वसन योज़ना राबविण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यामुळे शाहू वसाहतीतील या पुनर्वसन प्रकल्प रद्द करण्यासाठी कार्तिक ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल शाहू वसाहत बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली होती.

बांधकाम व्यावसायिकाकडून धमकावून एसआरए योजनेत सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता.झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध असल्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही येथील रहिवाशांचा एसआरए योजनेत समावेशाबाबत खोट्या सह्या दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अखिल शाहू वसाहतीचे सर्व नागरिकांनी एसआरएला तीव्र विरोध दर्शवत लढा उभारला. सामाजिक कार्यकर्ते हेमंत बागुल यांनीही त्याला पाठिंबा दिला.

या कृती समितीने उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती. काही दिवसांपूर्वी या स्थानिक नागरिकांनी पुण्यात एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी हा प्रकल्प स्थगित करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर तत्परने सर्व बाबी तपासून शाहू वसाहतीमधील एसआरए प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देत असल्याचे आदेशही काढण्यात आले आहेत. त्यामुळे शाहू वसाहतीचा स्वयंपुनर्विकास करण्यात येईल, असे अखिल शाहू वसाहत बचाव समितीने स्पष्ट केले.