पुणे : पाषाण, सूस, म्हाळुंगे, नांदे, चांदे या भागातील नागरीकांना तसेच पुणे शहरातून यामार्गे मुळशी, कोकण आणि हिंजवडी परिसरात होणारी वाहतूक कोंडी पाषाण-सूस उड्डाणपुलामुळे कमी होण्याची शक्यता आहे. पाषाण-सूस उड्डाणपूल शुक्रवारपासून (१६ सप्टेंबर) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, हिंजवडी माहिती आणि तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणारी वाहतूक कोंडीची समस्याही या उड्डाणपुलामुळे काही अंशी सुटेल, असा विश्वास राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर महानगरपालिकेतर्फे पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॅा. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे आणि अमोल बालवडकर यावेळी उपस्थित होते. या उड्डाणपुलाला राजमाता जिजाऊ भोसले यांचे नाव देण्यात  येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, अशी घोषणाही पाटील यांनी केली.

हेही वाचा : कुलगुरू निवडीच्या रखडलेल्या प्रक्रियेत एक पाऊल पुढे; शासन प्रतिनिधींची नावे निश्चित

चंद्रकांत पाटील म्हणाले की, चांदणी चौकातील सहापदरी पूल झाल्यावर या भागातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.  परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी त्यानुार भूसंपादन करून  प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल.

हेही वाचा : व्यावसायिकाला दोन महिलांकडून अडीच लाखाला गंडा

सन १९९५ नंतर उड्डाणपूल, तसेच रस्त्यांच्या बाबतीत राज्यात चांगली पाऊले टाकली गेली आहेत. शहरात मोठ्या पावसामुळे सिग्नल व्यवस्था बंद पडू नये यावर उपाययोजना करणे आणि अशावेळी ऐनवेळचे वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे, असे डॅा. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. उड्डाणपूल  ४७० मीटरचा असून पुलामुळे कात्रज आणि हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. फेब्रुवारी २०२० पासून पुलाचे काम सुरू करण्यात आले. उड्डाणपुलासाठी ४१ कोटी रुपये खर्च झाला असून उभारलेला ४७० मीटर लांबीचा हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चावरील पाषाण-सूसला जोडणारा आहे. पाषाण-कात्रज, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क, मुळशीला जोडणारा हा पूल वाहतूकीसाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी आणि मुळशीकडून येणारी वाहतूक सुकर होणार आहे.

हेही वाचा : कोथरुडमध्ये घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास

मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

उड्डाणपुलाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. तांत्रिक कारणामुळे त्यांना सहभागी होता आले नाही. तथापि, मुख्यमंत्र्यांनी  पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.