दापोडी-पिंपळे गुरव रस्त्यावरील घटना

पिंपरी : प्रवासी घेऊन निघालेल्या पीएमपी बसने अचानक पेट घेतला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी बचावले. कोणालाही इजा झाली नाही. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दापोडी-पिंपळे गुरव रस्त्यावरील पुलावर ही घटना घडली.

पुण्याच्या दिशेने सुमारे २५ प्रवाशांना घेऊन निघालेली ही बस पिंपळे गुरव – दापोडीला जोडणाऱ्या पुलावर आली, तेव्हा बसमधून अचानक धूर निघू लागला. चालक लक्ष्मण हजारे यांच्या लक्षात येताच त्यांनी बस थांबवली. वाहक मारुती गायकवाड यांनी सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. तोपर्यंत बसने पेट घेतला होता. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट दूर-दूरपर्यंत दिसत होते. थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अल्पावधीत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली. मोबाइलवर चित्रीकरण करण्याची चढाओढ नागरिकांमध्ये सुरू झाली. पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.