मुंढव्यातील पासपोर्ट सेवा केंद्र आणि औंधमधील पंडित भीमसेन जोशी सभागृह या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या पारपत्र मेळाव्यांमुळे पारपत्रासाठी भेटीची वेळ मिळवण्याचा कालावधी आणखी कमी झाल्याचे प्रादेशिक पारपत्र अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ‘नॉर्मल’ प्रक्रियेतून अर्ज केल्यानंतर औंधला केवळ ४ दिवसांत तर मुंढव्यात १२ दिवसांत पारपत्र खात्याची भेटीची वेळ मिळू लागली असून यामुळे नागरिक पारपत्र काढण्यासाठी ‘तत्काळ’कडून ‘नॉर्मल’ प्रक्रियेकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.
औंधच्या पंडित भीमसेन जोशी सभागृहात पारपत्र कार्यालयातर्फे १ मे पासून ‘पारपत्र महामेळावा’ सुरू करण्यात आला. तो अजूनही सुरू आहे. मुंढवा आणि औंध या दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या पारपत्र मेळाव्यांचा नागरिकांना पारपत्रासाठी भेटीची वेळ मिळवण्यात फायदा झाला असल्याचे प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘पूर्वी पारपत्रासाठी ‘नॉर्मल’ प्रक्रियेतून अर्ज केल्यानंतर पूर्वी साधारणत: ५५ दिवसांची ‘अपॉइंटमेंट सायकल’ होती. आता मुंढव्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात ‘नॉर्मल’ प्रक्रियेत अर्ज केल्यानंतर फक्त १२ दिवसांनी भेटीची वेळ मिळत आहे. तर औंधला नॉर्मल प्रक्रियेतच चौथ्या दिवशी भेटीची वेळ मिळत आहे. अपॉइंटमेंट सायकल आणखी कमी दिवसांची होण्याचे चित्र असून मुंढव्यात ती १० दिवसांवर येईल, तर औंधमध्ये तिसऱ्या दिवशीच भेटीची वेळ मिळू शकेल.’
पारपत्रासाठीच्या ‘तत्काळ’ प्रक्रियेवर पूर्वी असलेला बोजाही आता कमी झाल्याचे गोतसुर्वे यांनी सांगितले. पारपत्र खात्यातर्फे दररोज ‘तत्काळ’ प्रक्रियेसाठी १६० जागा ठेवलेल्या असतात. ३० मेपासून मात्र या जागा भरेनाशा झाल्या आहेत. गोतसुर्वे म्हणाले, ‘तत्काळसाठीच्या १६० जागांपैकी रोज केवळ ९० ते १२५ जागाच भरल्या जातात. ‘नॉर्मल’ प्रक्रियेतच भेटीची वेळ लवकर मिळू लागल्याने तत्काळसाठी येणारे अर्ज कमी झाले आहेत. ३० मे नंतरचे हे चित्र आहे.’

८ ऑगस्टला पारपत्र मेळावा
पारपत्र खात्यातर्फे ८ ऑगस्ट रोजी मुंढव्यात १,४५० अर्जदारांसाठी, तर औंधमध्ये ५५० अर्जदारांसाठी पारपत्र मेळावा घेण्यात येणार आहे. या दिवशी ‘ऑन होल्ड’, ‘तत्काळ’, ‘वॉक इन’, ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ या अर्जदारांना सेवा दिली जाणार नसल्याचे कार्यालयातर्फे कळवण्यात आले. या मेळाव्यासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना  http://www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर स:शुल्क अर्ज भरून भेटीची वेळ घ्यावी लागणार आहे. मुंढव्यातील केंद्रासाठी ८ तारखेची भेटीची वेळ ‘ऑनलाइन’ देण्यास ४ ऑगस्टला दुपारी १२ वाजता तर औंधमधील केंद्रासाठी ८ तारखेसाठीची वेळ ऑनलाइन देण्यास ५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे.