पुणे : राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये घेण्यात येत असलेल्या संकलित चाचणी २ या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी गुणांची नोंद करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच गुण भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक डॉ. नंदकुमार बेडसे यांनी या बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील संकलित चाचणी २ अंतर्गत ११ ते २२ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा या विषयांची समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, आता उत्तरपत्रिका तपासणी, विद्या समीक्षा केंद्रामार्फत गुण नोंदवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संकलित चाचणी २ या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याबाबत शिक्षकांना शिक्षकांनी तपासण्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र या संकेतस्थळावर भरायचे आहेत. विद्या समीक्षा केंद्राच्या https://be/PAT-MU या दुव्यावरील चॅटबॉटद्वारे १६ ते ३० एप्रिल या कालावधीत गुण नोंदवता येणार आहेत. गुण नोंदवण्याच्या कामकाजासाठी जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी यांनी एका अधिकाऱ्याकडे संकलित चाचणी जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी निश्चित केल्यानुसार संबंधित जिल्हा समन्वयकांनी शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्राच्या चॅटबॉटवर गुण नोंदवण्यासाठी आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे.
चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी https: //forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA या दुव्याद्वारे प्रतिसाद नोंदवावा. शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल या बाबतची दक्षता घ्यावी. संकलित चाचणी २च्या गुणांची नोंद ३० एप्रिलपर्यंत होणे अपेक्षित असून, त्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
सध्या काही शिक्षकांना निवडणुकीचेही काम करावे लागत आहे. त्याशिवाय परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी, निकाल तपासणी, प्रगती पुस्तक तयार कणे, गुण नोंदवणे या कामे शिक्षकांकडे आहेत. १ मे रोजी निकाल जाहीर करायचा असल्याने त्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांची धावपळ होत आहे. – तानाजी माने, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ महामंडळ
