पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी १ (पॅट) आणखी लांबणीवर पडली आहे. काही दिवसांपूर्वी नोव्हेंबरच्या अखेरीस परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता २, ३ आणि ५ डिसेंबरला परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. दरवर्षी संकलित चाचणी १ ही परीक्षा दिवाळी सुटीपूर्वी घेतली जाते. मात्र, यंदा या परीक्षेला विलंब झाला आहे. या विलंबाबत शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र, आता ही परीक्षा आणखी उशीराने घेतली जाणार आहे.

एससीईआरटीच्या पहिल्या सत्राच्या पॅट परीक्षेसाठीच्या नव्या परिपत्रकानुसार आता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची २ डिसेंबर रोजी प्रथम भाषा, ३ डिसेंबर रोजी गणिताची, तर ५ डिसेंबर रोजी तृतीय भाषा विषयाची चाचणी होणार आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमतांवर आधारित प्रश्न असतील. पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीची पडताळणी करून अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रम राबवण्याचा उद्देश या परीक्षेमागे आहे. या चाचणीचा विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण देऊ नये, चाचणीच्या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर गुण विद्या समीक्षा केंद्राच्या (व्हीएसके) संकेतस्थळावर नोंदवावे, गुणांच्या आधारे विद्यार्थीनिहाय उपचारात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारणपणे प्रथम सत्र दिवाळीपूर्वी संपून मूल्यमापन केले जाते. सर्व शाळांचे नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित झाले असते. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसऱ्या सत्राची अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होऊन त्याप्रमाणे पाठ्यक्रम पुढे जातो, प्रथम सत्राचे मूल्यमापन तिथून काही दिवसांनी होणार हे मुळातच पटण्यासारखे नाही. – विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती