विविध विषयांवरील ५० हजारांहून पुस्तकांचे दुमजली दुकान.. सेंट्रल एसी असल्याने थंडगार वातावरणात पुस्तके हाताळण्याची, वाचन करण्याची आणि मनसोक्त वेळ देत खरेदी करण्याची सोय.. गरम कॉफीची व्यवस्था व मंद संगीतामुळे प्रसन्न वातावरण.. अशा वैशिष्टय़ांसह काऊंटरविना खरेदी करण्याची सुविधा असलेल्या ‘पाथफाईंडर’ या पुण्यातील पहिल्या दुकानाने तीन वर्षांसाठी विश्रांती घेतली आहे. या जागेवर नियोजित असलेल्या टोलेजंग इमारतीच्या वरच्या मजल्यांवर पाथफाईंडर पुन्हा कार्यरत होणार आहे.
हा आगळावेगळा प्रयोग अॅड. प्रदीप खिरे यांनी दशकापूर्वी राबविला. साहित्यप्रेमींनी काऊंटरमागे जाऊन पुस्तके हाताळावीत, त्यांच्या आवडीची पुस्तके वाचावीत आणि त्यानंतर खरेदी करावी यासाठीची व्यवस्था असलेल्या पाथफाईंडर या दुकानाची निर्मिती झाली. या दुमजली दुकानामध्ये विविध वाङ्मयप्रकारांवरील किमान ५० हजारांहून अधिक पुस्तके सदैव वाचकांच्या तैनातीमध्ये असायची. केवळ पुस्तकेच नाही तर, बालकुमारांसाठी पुस्तके, ध्वनिफिती, सीडी, व्हिडीओ गेस्म यांसह वेगवेगळी खेळणी आणि अभ्यासाचे मनोरंजक खेळही या दुकानामध्ये होते. कुटुंबीयांसह पाथफाईंडरला भेट देणारे लोक काही तरी खरेदी केल्याशिवाय परत फिरायचेच नाहीत. गरम कॉफीचा वास ग्राहकाला आकर्षित करायचा आणि तेथे बसून वाचनाचा आनंद लुटताना कॉफीचाही स्वाद आवर्जून घेतला जात होता.
पाथफाईंडरच्या दुसऱ्या मजल्यावर पुस्तकांचे रॅक बाजूला केले की तेथे कट्टा तयार होत असे. या कट्टय़ावर गेल्या दहा वर्षांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांनी अनुभवली आहे. पाथफाईंडर ही संकल्पना रुजविण्यासाठी खिरे यांना सहकार्य करणाऱ्या आशय सांस्कृतिक आणि आशय फिल्म क्लबचे कार्यालयदेखील याच मजल्यावर होते. आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुलोत्सवा’तील विविध कार्यक्रम याच पाथफाईंडर कट्टय़ावर रंगले आहेत. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर, गिरीश कर्नाड, डॉ. एस. एल. भैरप्पा, द. मा. मिरासदार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रसिकांना पुलकित केले आहे. एवढेच नव्हे तर, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित शाहरुख खान आणि गौरी जोशी यांच्या भूमिका असलेल्या ‘स्वदेस’ चित्रपटातील एका दृष्यामध्ये पाथफाईंडर दुकान झळकले आहे. गेल्या दशकभरापासून पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी समरस झालेले पाथफाईंडर हे दुकान आता किमान तीन वर्षांसाठी विश्रांती घेत आहे. या जागेवर नियोजित असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर पुन्हा पाथफाईंडर पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.