मराठा आंदोलनाचा फटका रुग्णांनाही; एसटी सेवा बंद राहिल्याने स्थानकांत रात्र काढावी लागली

एसटी च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवाशांना एसटी स्टॅण्डवरच रात्र काढण्याची वेळ आली

मराठा आंदोलनामुळे एसटी सेवा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना रात्र स्थानकांतच काढावी लागली.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील अनेक भागात तीव्र आंदोलन केले जात आहे.तर आज चाकण येथील आंदोलनास हिसंक वळण मिळाल्याने स्वारगेट आणि शिवाजीनगरमधून सर्व एसटी च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अनेक प्रवाशांना एसटी स्टॅण्डवरच रात्र काढण्याची वेळ आली असून याच प्रवाशामधील शिवाजीनगर एसटी स्टॅण्डमधील ज्ञानदेव कांबळे यांना रुग्णालयातून डीचार्ज देण्यात आला.मात्र बस सेवा बंद असल्याने त्यांना आजची रात्र स्टॅण्डवर काढण्याची वेळ आल्याने त्यांचा मुलगा विकास कांबळे म्हणतात बाबांना आता घरी कसे घेऊन जाऊ सर्व बस सेवा बंद आहे.

राळेगणसिद्धी येथे राहणारे ज्ञानदेव कांबळे यांचे वय ६० यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हार्नियाच्या ऑपरेशनसाठी ११ तारखेला अडमिट करण्यात आले.त्यानंतर त्यांच्यावर आठवड्याभरापूर्वी ऑपरेशन करण्यात आले.ज्ञानदेव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने डॉक्टरानी त्यांना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डीचार्ज देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार आज दुपारी अडीच वाजता शिवाजीनगर येथील एसटी स्टॅण्डमध्ये आल्यावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी चाकण येथे गाड्याची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याने एसटी बाहेर सोडण्यात येणार नाही.असे एसटी कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले.तेव्हा पासून आतापर्यंत सहा तासा झाले.एक ही बस आता आली नाही किंवा बाहेर गेली.त्यामुळे माझ्यासह सर्वांचे हाल होत नाही.मात्र यात माझ्या वडिलांचे अधिक हाल होत आहे.त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाल्याने त्यांची खूप काळजी घ्यावी लागते.आता बस सेवा बंद असल्याने बाबाना कसे घेऊन जाऊ असा प्रश्न पडला आहे.असे सांगत असताना त्यांचा कंठ दाटून आला होता.आमचे पुण्यात कोणी पाहुणे नाही.आजची रात्र तरी स्टॅण्डवर काढावी लागते. अशी भावना व्यक्त करीत या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू दे अशी मागणी सरकारकडे त्यांनी यावेळी केली.

आज चाकण येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलना दरम्यान एसटी बस आणि खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर एसटी च्या पुणे विभागामार्फत शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारामधून बाहेरगावी सर्व फेऱ्या दुपारपासून रद्द केल्या.शिवाजीनगर एसटी स्थानकात दुपार पासून बस जागेवरच उभ्या होत्या.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक आणि प्रवाशाचे मोठ्या प्रमाणावर हाल झाल्याचे पाहाव्यास मिळाले.तर रात्री आठच्या नंतर अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द करून खासगी वाहनाने म्हणजे ट्रॅव्हलस ने जाणे पसंद केले.मात्र त्यांचे दर देखील दुप्पट झाल्याने प्रवाशाच्या खिशावर एक प्रकारे डल्ला माराल्याचे पाहाव्यस मिळाले.तर एसटी बस सेवा केव्हा सुरू होणार अशी विचारणा सारखी होत असल्याने हे लक्षात घेता. स्टॅण्डमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Patient suffer due to st bus close during maratha reservation protest