पिंपरी : मावळातील पवना धरण शंभर टक्के भरले असून शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ११ हजार २०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पवना नदीला पूर आला असून दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहर, ‘एमआयडीसी’सह काही नगरपालिका, मावळ तालुक्यातील गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जाेरदार पाऊस काेसळत आहे. ९ ते २१ जुलै या कालावधीत पावसाने काहीशी विश्रांती घेतली हाेती. २२ जुलैपासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी मध्यरात्री पासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत असून धरणातील येवा वाढला आहे.

धरणातील पाणीसाठा ९९.७० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. विद्युत गृहद्वारे १४०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. दिवसभर टप्पाटप्प्याने त्यात वाढ करण्यात आली. सायंकाळी साडेसहा वाजता विसर्गात वाढ करून ११ हजार २०० क्‍युसेक्‍सने पाण्याचा विसर्ग सुरू केला. पावसाचा अंदाज घेऊन विसर्गामध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावेत, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले आहे. 

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

पावसाच्या वाढत्या संततधारेमुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन मदत हवी असल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष क्रमांक ०२०-६७३३११११/०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे. 

सखल भाग, पूरप्रवण परिसर, नाले, पूल तसेच संवेदनशील ठिकाणांवर सातत्याने पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.