राज्यातील प्रामुख्याने अ-वर्गातील ३८ आणि ब-वर्गातील ११७० अशा एकूण १२०८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या शासन आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले होते. त्यावर खंडपीठाने ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्या टप्प्यावर २१ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबतचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.
हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; सरपंचपदासाठी ५१९, सदस्यपदासाठी ३०१३ उमेदवार




खंडपीठाच्या आदेशानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संबंधित सहकारी संस्थांचे सुधारित निवडणूक कार्यक्रम मान्यतेसाठी पाठविण्याच्या सूचना जिल्हा आणि तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्य सरकारने न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था वगळून राज्यातील अ आणि ब-वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश २९ नोव्हेंबरला दिला होता. राज्यात ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम एकाच कालावधीत आला होता. त्यामुळे अ-वर्गातील ३८ आणि ब-वर्गातील ११७० अशा एकूण १२०८ सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.
दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सहकारी संस्थांचे सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्याबाबतही प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी राज्यातील सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.