Teacher Jobs Maharashtra 2026: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा, शासकीय शाळांतील शिक्षकांच्या ३० हजार २०९ पदांसाठी पवित्र संकेतस्थळामार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवता येणार असून, पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने, रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रताधारक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ ही परीक्षा २७ ते ३० मे तसेच २ ते ५ जून २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षा दिली. या परीक्षेतील गुणांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील शिक्षण सेवक, शिक्षक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. रिक्त पदे आणि शिल्लक आरक्षण विचारात घेऊन ८० टक्के पदांसाठी भरती करण्याचे शासनाचे आदेशानुसार नियोजित आहे. पवित्र संकेेतस्थळावर जाहिरातींची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यात १९८८१ पदे मुलाखतीशिवाय, तर १०३२८ पदे मुलाखतीसह पदांचा समावेश आहे, असे नमूद करण्यात आले.
पदभरतीबाबत उमेदवारांना पवित्र संकेतस्थळावर प्राधान्यक्रम नमूज करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी पदनिहाय प्राधान्यक्रम नमूद करून ११ ऑगस्टपर्यंत त्यांचे प्राधान्यक्रम अंतिम करणे आवश्यक आहे. पदभरतीसाठी उमेदवारांच्या प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
अधिक माहिती https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले. अभियोग्यता चाचणीनंतर पात्रताधारक उमेदवार वर्षभराहून अधिक काळ पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता जाहिराती प्रसिद्ध होऊन रिक्त पदांचा तपशील जाहीर झाला आहे, तसेच प्राधान्यक्रम नोंदवण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्रताधारक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
व्यवस्थापननिहाय रिक्त पदे
जिल्हा परिषद -१३३५१
नगरपालिका-नगरपरिषदा – २८०
महानगरपालिका – १९५४
आदिवासी विकास विभाग – २४२१
शासकीय विद्यानिकेतन – ५६
खासगी शिक्षण संस्था – १२१४८
गटनिहाय रिक्त पदे
पहिली ते पाचवी – १४३२०
सहावी ते आठवी – १००१२
नववी ते दहावी – ५५१३
अकरावी ते बारावी – ३६४
