पुणे : राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीविना निवड प्रकारात १३ हजार ११९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वाधिक ८४८१ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून त्यांना लवकरात लवकर रुजू करून घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या बाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे, राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे, राजेश शिंदे या वेळी उपस्थित होते. शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शाळा व्यवस्थापनांनी दिलेल्या जाहिरातीनुसार ३०,२०९ पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले होते.

स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका-नगरपरिषद, महापालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन, खासगी अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीविना निवड या प्रकारासाठी एकूण १९ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १३ हजार ११९ जागांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी ७५४१, सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ४२०७, नववी ते दहावी या वर्गांसाठी १११९, अकरावी ते बारावी या वर्गांसाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

सिंह म्हणाले, निवड प्रक्रियेत प्रत्येक पदासाठीचे पात्रता गुण (कटऑफ) संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. आता या उमेदवारांना लवकरात लवकर सुरू करून घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना रूजू करून घेतले जाणार आहे. नवे शिक्षक रूजू होऊन राज्यातील शाळांतील अध्ययन अध्यापन प्रक्रिया गतिमान होणार आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळणार आहे.

तक्रार निवारण समितीची स्थापना पदभरतीतील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांचे काही म्हणणे, मागणी, तक्रारी असल्यास त्यासाठी ‘तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी edupavitra2025grcc@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समांतर आरक्षणातील रिक्त पदांसाठी स्वतंत्र

समांतर आरक्षणातील माजी सैनिक, अंशकालीन प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने २७६० आणि १७६० पदे रिक्त राहिली आहेत. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२, पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील १४०८ पदे रिक्त राहिली आहेत. मात्र, आरक्षणाअंतर्गत रिक्त राहिलेली पदे त्या त्या प्रवर्गात रुपांतरित करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत रिक्त पदे रुपांतरित करून नव्याने फेरी राबवण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

व्यवस्थापननिहाय शिफारस झालेले उमेदवार

जिल्हा परिषद – ८४८१

नगरपालिका-नगरपरिषद – २२६

महापालिका – १३०६

आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा – १६०१

शासकीय विद्यानिकेतन – ५४

खासगी अनुदानित शिक्षण संस्था – १४५१