पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठीच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५मध्ये कोणीही उमेदवारांनी दुबार परीक्षा दिली नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे. मात्र, काही उमेदवार माहिती लपवून किंवा दिशाभूल करून निवड प्रक्रियेत सहभागी झाल्याचे, निवड झाल्याचे निदर्शनास आल्यास टप्प्यावर नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून निवड रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाकडून या बाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५मध्ये ६४ उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्याची, त्यांची निवड झाल्याची माहिती काही माध्यमांतून प्रसिद्ध झाल्याची बाबत शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली. त्याबाबत पडताळणी केली असता यादीत दर्शविण्यात आलेल्या ६४ उमेदवारांच्या नावामध्ये साधर्म्य आढळून येत असल्याने प्रथम दर्शनी संबंधित उमेदवार एकच असल्याचे दिसून येते. मात्र, आधार क्रमांक, जन्मतारीख, आईचे नाव, ई-मेल क्रमांक, मोबाइल क्रमांक अशा तपशीलावरून पडताळणी केली असता संबंधित उमेदवार वेगवेगळे असल्याचे दिसून येते आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२५ दिलेल्या सर्व उमेदवारांनी दुबार परीक्षा दिल्याबाबत पडताळणी करण्यात आली आहे. उमेदवारांनी अपूर्ण अर्ज, चुकीचे अर्ज अशा विविध कारणास्तव अनेक अर्ज केले असले, तरी उमेदवारास कोणत्याही एकाच ठिकाणी परीक्षा देता येईल आणि उर्वरित प्रवेशपत्र जमा करण्याच्या सूचना उमेदवारांना प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत दुबार परीक्षा देता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, काही उमेदवार माहिती लपवून अथवा माहितीत तफावत दाखवून, दिशाभूल करून निवड प्रक्रियेत सहभागी झाल्याचे आढळून आल्यास, कोणी निदर्शनास आणून दिल्यास पडताळणीअंती संबंधित उमेदवाराची निवड झाली असल्यास कोणत्याही टप्प्यावर नियुक्ती प्राधिकारी यांचेकडून निवड रद्द केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका-नगरपरिषद, महापालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतन, खासगी अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीविना निवड या प्रकारासाठी एकूण १९ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १३ हजार ११९ जागांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी ७५४१, सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ४२०७, नववी ते दहावी या वर्गांसाठी १११९, अकरावी ते बारावी या वर्गांसाठी २५२ उमेदवारांची शिफारस करून नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
